मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सध्या वैशाख सुरू असून उन्हाळा अंतिम टप्प्यात आहे. उन्हाळ्यात वैयक्तिक लाभाच्या विहिरींसह रोहयोच्या विहिरींची कामे केली जातात, मात्र उन्हाळा संपत आला तरी सदरील कामे आटोपलेली नाहीत. वैयक्तिक लाभाच्या बांधकाम पूर्ण झालेल्या विहिरींची संख्या अत्यंत कमी आहे.
वैयक्तिक लाभांच्या विहिरीमध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत 359 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 190 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यातील 171 कामे प्रत्यक्षात सुरू करण्यात आली. तर 82 विहिरींची कामे पूर्ण झालेली आहेत. त्यापैकी 17 विहिरींच्या कामांना तीन कोटी 51 लाख 39 हजार 775 रुपये एवढा निधी देण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यात 36, वसमत तालुक्यात 5, हिंगोली तालुक्यात 3, कळमनुरी तालुक्यात 30, तर सेनगाव तालुक्यात 8, असे एकूण 82 विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत ७१९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 213 विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रत्यक्षात 176 विहिरींची कामे सुरू झाली. तर 55 विहिरींची कामे पूर्ण होऊन छायाचित्रे अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी 34 विहिरींच्या कामांना तीन कोटी 23 लाख 43 हजार 639 रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यात 14, वसमत तालुक्यात 9, हिंगोली तालुक्यात 12, कळमनुरी तालुक्यात 13, सेनगाव तालुक्यात 7, असे एकूण 55 विहिरींची कामे पूर्ण होऊन त्यांच्या छायाचित्र शासनाच्या वेब पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत.