मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील फाळेगाव येथील पोलीस पाटील यांनी गावात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्याची माहिती पोलिसांना न दिल्याने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.
हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे मागील पाच वर्षांपासून कविता विठ्ठल डुडुळे ह्या पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत फाळेगाव येथे काही व्यक्तींनी शासनाची परवानगी न घेता 14 नोव्हेंबर 2023 रोजी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारला. सदरील घटनेची कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप संबंधित पोलीस ठाणे किंवा वरिष्ठ अधिकारी यांना दिलेली नाही.
अशी गोपनीय माहिती संबंधित पोलीस ठाण्यास कळविणे बंधनकारक असताना सुद्धा पोलीस पाटील यांनी सदरील माहिती लपवून ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 6 (तीन) नुसार आपल्या गावातील अपराधांचे प्रमाण व ग्राम पोलिसांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी याविषयी आणि गावातील समाजाचे स्वास्थ्य व त्यांची सर्वसाधारण परिस्थिती याविषयी अशा कार्यकारी दंडाधिकाऱ्यास नियमितपणे माहिती देईल.
तसेच सदरील अधिनियमाचे कलम 6 (सहा) नुसार सार्वजनिक शांततेस ज्या गोष्टीमुळे धोका पोहोचेल अशा गोष्टीविषयी गुप्तपणे माहिती गोळा करून ती ठाणे अधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असतानाही सदरील घटनेची माहिती संबंधित पोलीस पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकारी यांना कळविली नाही.
त्यामुळे पोलीस पाटील यांनी त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा व कसुरी केली असल्याचे नमूद करून पोलीस पाटील यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम – 1967 चे कलम 9 नुसार निलंबनाची कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
तसेच संदर्भ क्रमांक 3 अन्वय उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग हिंगोली ग्रामीण यांनी संदर्भ क्रमांक 2 अन्वये सादर केलेल्या अहवालाशी सहमत असल्याबाबत कळवून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास विनंती केली आहे.
त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 अन्वये अन्वय संबंधित पोलीस पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला असता संदर्भ क्रमांक 5 अन्वये त्यांनी खुलासा सादर केला; मात्र तो समाधानकारक नाही.
त्यामुळे पोलीस पाटील कविता विठ्ठल डुडुळे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे सिद्ध झाल्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 च्या तरतुदीनुसार उपविभागीय दंडाधिकारी हिंगोली यांनी त्यांना प्राप्त असलेल्या शक्तींचा वापर करून उमाकांत पारधी उपविभागीय दंडाधिकारी हिंगोली यांनी पोलीस पाटील कविता विठ्ठल डुडुळे यांना कर्तव्यात कसूर व निष्काळजीपणा केल्याने महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम – 9 नुसार शासन सेवेतून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केले आहे.