मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – पिकविम्याचे पैसे तातडीने द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील भगवती आणि परिसरातील गावांतील शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीमध्ये गुरुवारी जलसमाधी आंदोलन केले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पिकविमा रकमेच्या संदर्भात पुढील कार्यवाही शासनस्तरावर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. परंतु, पिकविम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडलेले नाही. यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी कार्यालयावर २३ डिसेंबर २०२२ रोजी मोर्चा काढला होता. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पिकविमा परताव्याची रक्कम देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
परंतु अद्याप आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने आज भगवती येथे पैनगंगा नदीपात्रात उतरून शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात भगवतीसह माझोड, गुगूळ पिंपरी, तपोवन, गारखेडा, कडोळी, गोरेगाव यासह दहा ते पंधरा गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
या वेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी कृषी व महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी भेट दिली.
त्यांनी शेतकऱ्यांना पिकविमा रकमेच्या संदर्भात पुढील कार्यवाही शासनस्तरावर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात सरपंच वासुदेव जाधव, अर्जुन नाईक, बालाजी कोळसकर, नामदेव पतंगे, अमोल कोळसकर, बबन जाधव, साहेबराव जाधव, बबन कांबळे, शेख आयुब, सुरेश जाधव, शेख सोनू, शेख निजाम, भाऊराव कांबळे, रामजी जाधव, प्रल्हाद जाधव यांच्यासह सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.