मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य) अंतर्गत सोयाबीन पिकांचे केडीएस-726 या वाणाचे बियाणे मिनीकिट वितरण कार्यक्रम मंजूर केला आहे. केंद्र शासनाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सोयाबीन बियाणे मिनीकिट हिंदूस्थान इन्सेक्टीसाईट लिमिटेड (एचआयएल) या संस्थेकडून हिंगोली जिल्ह्यासाठी पुरविण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे सूचना आहेत.
सोयाबीन बियाणे मिनीकिट वितरण निशुल्क स्वरुपात असल्याने यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलाही मोबदला घेतला जाणार नाही. केंद्र शासनाकडून बियाणे मिनीकिट हे वाणांचा परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रायोगिक तत्वावर निशुल्क स्वरुपात उपलब्ध करुन दिले जात असल्याने याबाबत कुठल्याही स्वरुपातील दावे ग्राह्य राहणार नाहीत.
बियाणे मिनीकिटसाठी शेतकरी निवडताना सोयाबीन पिकासाठी सलग 25 हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांची निवड कृषि विभागामार्फत होईल. बियाणे मिनीकिटला आवश्यक ठरणाऱ्या बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्याची खातरजमा करावी.
वरील सूचनांनुसार सोयाबीन बियाणे मिनीकिट वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी जवळच्या कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
या योजनेअंतर्गत बियाणे मिनीकिट या घटकाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.