मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शेतकऱ्यांच्या उसाला प्रतिटन अडीच हजार रुपयांचा दर देण्यात यावा अन्यथा शिरूर साखर कारखान्याला टाळे ठोकू, असा इशारा शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिऊर साखर कारखान्याचे प्रशासन नमले असून शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन अडीच हजार रुपये असा भाव मिळणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पुढील सन व उत्सव गोड साजरे होणार आहेत.
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी तीन चार दिवसापूर्वी शिउर साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 2560 रुपये भाव देण्यात यावा व शेतकऱ्यांना वेठीस धरू नये अन्यथा मी साखर कारखान्यास टाळे ठोकीन असा सज्जड इशारा शिऊर साखर कारखान्याच्या प्रशासनास दिला होता.
तसेच आज 23 ऑगस्ट रोजी परिसरातील शेतकरी हे कारखान्यासमोर उपोषणास बसले होते. आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या इशाऱ्याने शिउर साखर कारखान्याच्या प्रशासनाचे धाबे दणाणले व त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला 2500 रुपये भाव देऊ असे आज जाहीर केले.
आमदार संतोष (दादा) बांगर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्याच्या प्रशासनाला सज्जड इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला भेटण्याचा मार्ग मोकळा झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार संतोष (दादा) बांगर यांचे आभार मानले आहेत.