मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना घातक शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यातील चार आरोपी हे यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. या आरोपींकडून 7 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात विविध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे वसमत उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाने आपल्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून एक डिसेंबर रोजी काही इसम हे आखाडा बाळापूर येथील
नवीन बस स्थानक परिसरात हनुमान नगर च्या समोर बाळापुर ते बोलडा जाणाऱ्या रोडच्या बाजूस ज्ञानसागर शाळेच्या अलीकडे रोडच्या बाजूला शेतात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर अंधारात एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकप उभी असून गाडीजवळ पाच इसम संशयितरित्या दबा धरून एखादा गंभीर मालाविरुद्धचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबलेले आहेत व त्यांच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाचे पिकप चार चाकी वाहन एमएच क्रमांक 26 बीइ 2821 गाडी आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सदरील ठिकाणी पोहोचून सदरील वाहनाच्या काही अंतरावर पोलीस वाहन थांबवून पांदण रस्त्यावर अंधारात एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप उभी असून गाडीजवळ पाच व्यक्ती संशयितरित्या दबा धरून बसलेले दिसताच त्यांच्यावर छापा मारला.
त्यांना जागीच पकडून त्यांची चौकशी केली असता सय्यद सोहेल सय्यद युनूस (वय 22 वर्षे व्यवसाय मजुरी), सय्यद रमजान सय्यद अब्दुल (वय 22 वर्ष व्यवसाय वाहन चालक), शेख जहीर शेख बाबू, (वय 19 वर्षे व्यवसाय मजुरी रा. ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ) अल्फाजोदिन उर्फ गैरोदिन मुजोबोद्दीन काजी (वय 21 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. सुकळी जहागीर ता. उमरखेड जि. यवतमाळ) व सय्यद अमजद सय्यद रहीम (वय 30 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. ताज नगर आखाडा बाळापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली) अशी त्यांनी नावे सांगितली.
या आरोपींची व त्यांच्या वाहनांची झरती घेतली असता सदरील आरोपींकडून एक बोलेरो पिकअप तीन मोबाईल एक तलवार, एक बॅटरी, एक खंजीर, एक लोखंडी कुऱ्हाड, एका प्लास्टिक बंदी मध्ये मिरची पावडर, एक दोरी अंदाजे 17 फूट लांब, असा ऐकून 7 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सर्व साहित्य ताब्यातील व्यक्तींच्या जवळ व गाडीत मिळून आल्याने पोलिसांना खात्री झाली की, सदर व्यक्ती हे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीने एकत्र आले असून त्यांना वेळीच ताब्यात घेतले नसते तर एखादा गंभीर दरोड्यासारखा गुन्हा घडला असता अशी खात्री झाली.
या आरोपींविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे भादंविसह कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलिस अंमलदार रामेश्वर मिसाळ, रामदास गैदलवाड, विनायक जाधव, शिवाजी पवार, चापोशी विजय जाधव, राजेश मुलगीर सर्व पोलीस ठाणे आखाडा बाळापूर यांच्या पथकाने केली.