मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर बोटावर मोजण्याइतके शिक्षक असून अपुऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदरील नुकसान टाळण्यासाठी व शाळेत शिक्षक देण्यासाठी 13 सप्टेंबर मंगळवार रोजी विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन गाठून आपले प्रश्न मांडले.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव हे हिंगोली जिल्ह्यातील राजकारणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अशा या राजकारणाच्या बाहेर घरात जिल्हा परिषदेच्या शाळेवर अत्यंत कमी म्हणजेच पाच शिक्षक सद्यस्थितीत कार्यरत आहेत. या शाळेत इयत्ता पहिली पासून इयत्ता दहावी पर्यंत असे एकूण 570 विद्यार्थी असल्याची माहिती पालकांनी दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असताना शिक्षक मात्र पाचच असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होते अनेक विषयांना विद्यार्थी नसून काही शिक्षकांकडे दोन पेक्षा जास्त विषय व वर्ग देखील असल्याचे समजते. त्यामुळे राजकारणाचे माहेरघर असलेल्या गोरेगाव येथील विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड गैरसोय होत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व शाळेवर शिक्षक देण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय भैया देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख विनायक भिसे पाटील, अमोल खिल्लारे आदींनी या विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या दालनात बसवून शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानी बाबत तसेच अडीअडचणी बाबत चर्चा केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक पाहिजेत अशी घोषणाबाजी केली विद्यार्थ्यांच्या या घोषणांनी जिल्हा परिषदेची इमारत व परिसर दणाणून गेला होता.
वृत्त लिहीपर्यंत गोरेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून कोणतेही आश्वासन दिले नव्हते.