गमा
वनाखालील क्षेत्र पूर्वीप्रमाणे राहिले नाही. मांसभक्षीय प्राणी (बिबट्या, वाघ) जिल्ह्यातून हद्दपार झाले परिणामी रोही, रानडुक्कर, माकड, वानर हे वन्य प्राणी नियंत्रणा बाहेर वाढू लागले आहेत. त्याचा त्रास अन्नदात्या शेतकऱ्यांसह खेडेगावातील महिला, बालके व ग्रामस्थांना देखील होऊ लागला आहे. जिल्ह्यातील जैवविविधतेची अन्नसाखळी बिघडल्याने या परिणामांना जिल्हावाशीयांना सामोरे जावे लागत आहे. वन्य प्राण्यांचा त्रास सहन होत नाही हे मान्य पण पर्यावरणातील अन्नसाखळी विस्कळीत होतेय ही गंभीर बाब. त्याकडे राजकारण्यांसह सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे आहे…
हिंगोली जिल्ह्यातील जैवविविधतेतील अन्नसाखळी बिघडल्याने गवत वा शेतकऱ्यांची पिके खाणाऱ्या वन्य प्राण्यांचा हैदोस आपल्याला पाहायला मिळतोय.. यास काही प्रमाणात शेतकऱ्यांसह ग्रामस्थही असल्याचे निदर्शनास येते…हिंगोली जिल्ह्यात वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी ज्या प्रमाणात जंगल होते तसे जंगल आता राहिले नाही. घनदाट जंगल असलेला काही कि.मी. चा परिसर राहिला नाही. परिणामी मांसभक्षीय प्राणी आपोआप कमी झाले. बिबट्या वा वाघ जिल्ह्यात कुठेच नाही. त्यामुळे गवत, फळे वा शेतकऱ्यांची पिके खाणाऱ्या वन्य प्राण्यांची संख्या वाढत गेली आणि त्यांनी सर्वत्र हैदोस घातला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान प्रामुख्याने होऊ लागले आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील महिला, बालके व ग्रामस्थांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे.
घरात माकड शिरल्याचे वनविभागास येऊ लागले फोन!-वन्य प्राण्यांमध्ये रोही रानडुक्कर माकड वानर यांचा प्रामुख्याने समावेश हिंगोली वनपरिक्षेत्रात दिसून येते यापैकी वानर माकडांना खेडेगावातील महिला तसेच ग्रामस्थ अन्न बाहेर ठेवून खाऊ घालू लागल्याने तसेच काही ठिकाणी तृणधान्य या वन्य प्राण्यांना सहज मिळू लागल्याने ते अलगद गाव – शिवारातच नाहीतर ग्रामस्थांच्या घरावर, छतावर तसेच घरातही दाखल होऊ लागले आहेत. काही ठिकाणी हे वन्य प्राणी घरात घुसून बाहेर निघत नसल्याने हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तसेच वनविभागास ग्रामस्थांचे फोन येऊ लागले आहेत, अशी माहिती हिंगोली वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी दिली आहे.
वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान – अनेक ठिकाणी दाट झाडी असलेली जमीन शेतीसाठी उपयोगात आणली गेल्याने वन्य प्राण्यांना गाव शिवारात तृणधान्य, गवत, फळे, अन्न मिळू लागले आहे. त्यामुळे सहाजिकच गाव शिवारात त्यांचा अधिवास राहत आहे. शेतातील खरीप व रब्बी हंगामातील पिके ही वन्यप्राणी खाऊन नुकसानही करतात. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. दिवसभर शेतकरी शेतातील कामे करता करता माकड, वानर यांनाही हाकत असतो. त्यांच्यापासून बचाव करत असतानाच शेतकरी सायंकाळी घरी जाताच रोही, रानडुकरे हे शेतात येऊन शेत पिकांचे नुकसान करतात. शेतात या वन्य प्राण्यांना सहज अन्न मिळू लागल्याने तसेच दाट झाडीचा परिसर नसल्याने अनेक वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेताच्या काही मीटर अंतरावर उभी राहतात. शेतकरी व त्यांचे कुटुंब जेच का घरी निघाले की हे वन्य प्राणी शेतात घुसतात, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सांगितले.
पंचनामे करण्यात होते दमछाक – वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाकडून प्रामुख्याने केले जातात; मात्र एका वनरक्षकाकडे 60 ते 70 गावे सोपविली गेली आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांच्या संदर्भात ऑनलाईन तक्रारी करता येतात; मात्र पंचनामे प्रत्यक्षात जाऊन करावे लागतात. पंचनामे करताना अनेक ठिकाणी तलाठी व मंडळ अधिकारी उपलब्ध नसतो. ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी येण्यास टाळाटाळ करतात. वन विभागात पंचनाम्यांसह वनविभागाचे इतर अनेक कामे सोपविलेली असतात. त्यामुळे काही प्रकरणांच्या निपटार्यास वेळ लागतो, मात्र शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाकडून तात्काळ केले जातात.
जैवविविधतेतील अन्नसाखळी बिघडल्याने शेतकरी, ग्रामस्थांना वन्य प्राण्यांचा त्रास – हिंगोली वनपरिक्षेत्रात झाडांचे प्रमाण वाढविण्यासह झाडांची अवैध कत्तल रोखून वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र, या वन्य प्राण्यांना सर्वच ठिकाणी सहज अन्न उपलब्ध होईल असे नाही.. तसेच जिल्ह्यात बिबट्या अथवा वाघ असते तर या वन्य प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहिले असतील तसेच या मांसाहारी प्राण्यांची दहशत राहिले असते मात्र यासाठी मोठा परिसर घनदाट जंगलाखाली आणायला हवा. परंतु जैवविविधतेतील ही अन्नसाखळी बिघडल्याचे कारणही काही प्रमाणात यास कारणीभूत ठरले आहे. त्याचा त्रास ग्रामस्थ व अन्नदात्या शेतकऱ्यांना होऊ लागला आहे, अशी माहिती हिंगोली वन विभागाकडून देण्यात आली.