मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि ढोल – ताशाच्या गजरात लाडक्या श्रीगणरायाचे आगमन झाले. 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर हिंगोली जिल्हाभरात महाराष्ट्राचे लाडके दैवत श्री गणरायाचे आगमन झाले. सकाळपासून नागरिकांनी बाजारातून श्रींच्या मूर्ती खरेदी करून मोठ्या भक्ती भावाने आणि ढोल – ताशाच्या गजरात श्रींचे घरोघरी स्वागत झाले.
हिंगोली शहर व जिल्ह्यातील गणेश मंडळांकडूनही सकाळपासून श्रींच्या आगमनाची तयारी केली जात होती. रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळाकडून गणरायांची आगमन होत होते.
यावेळी बाजारात विविध आकाराच्या आणि विविध सजावटीच्या श्रींच्या मुर्त्या विक्रीस आल्या होत्या. दरवर्षी श्रींच्या आगमना वेळी अत्यल्प का होईना पाऊस होत असतो. त्यामुळे यंदाही श्रींच्या आगमनादरम्यान वरून राजा हजेरी लावेल, अशी अपेक्षा होती. मात्र रात्री 10 वाजेपर्यंत पाऊस झाला नव्हता.
कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष, विकासशील, लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांच्या निवासस्थानी श्रींची स्थापना झाली. यावेळी त्यांनी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडून शेतीवर आलेले संकट दूर करो, अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली.
गणेश चतुर्थी निमित्त विविध मंडळांकडून बाजारात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत केले जात होते. बाप्पांच्या स्वागतासाठी हिंगोली येथील बाजारपेठेत मोठी गर्दी पहावयास मिळाली.