मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील लिंबाळा मक्ता एमआयडीसी परिसरात वर्कशॉप व इतर साहित्य चोरी करणारी तसेच शेतातील मोटार चोरणारी टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जेरबंद केली आहे. या टोळीकडून सहा गुन्हे उघड झाले असून एकूण 1 लाख 5 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी परिसरातील फिर्यादी यांच्या सिमेंट प्रॉडक्ट बनविण्याच्या मोकळ्या जागेत असलेले मोटार, मशीन, वायर व इतर साहित्य (किंमत 46 हजार रुपये) कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी केल्याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि अन्वय गुन्हा दाखल झाला होता.
अशाच प्रकारे यापूर्वी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत मोटार वायर व त्या संबंधित साहित्य चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरचे गुन्हे उघड करून सदर गुन्हे करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद घटनास्थळी व परिसरास भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेत सदरचे गुन्हे हे कदीर सुलेमान शेख (वय 35 वर्ष), रहीम युसुफ पठाण (वय 30 वर्ष), विश्वनाथ ज्ञानबा गवळी (वय 42 वर्ष, तिन्ही रा. लिंबाळा मक्ता) व शेख अबरार शेख खमरोद्दिन (वय 27 वर्ष रा. औंढा नागनाथ) यांनी मिळून केल्याबाबत तपास पथकाला माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींना सापळा रुचून सीताफिने ताब्यात घेतले. त्यांची कसून तपासणी केली असता त्यांनी वर नमूद हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे व सोबतच नरसी नामदेव येथील दोन, कळमनुरी, बासंबा व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासात त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरून नेलेला केबल वायर किंमत 7 हजार 400, गुन्ह्यातील चोरून नेलेले मोटार तोडून विक्री करून मिळविलेली नगदी 58 हजार रुपये व गुन्ह्यात नेहमी वापरलेले दुचाकी मोपेड / लुना किंमत 40 हजार रुपये असा एकूण 1 लाख 5 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींना पुढील तपासासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दीपक पाटील, दत्ता नागरे यांनी केली.