मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील बसंबा पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या पिंपळदरी परिसरात पोलिसांना गांजा आढळून आला आहे. यावेळी पोलिसांनी 20 किलो हून अधिक गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख 89 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हिंगोली चे डॅशिंग व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही बाबत पेट्रोलिंग दरम्यान हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बासुंबा पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळदरी शेत शिवारात अंबादास सोनटक्के व माधव सोनटक्के यांनी त्यांच्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेली गुंगीकारक वनस्पती गांजाची झाडे लावले आहेत.
या मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासोबत हिंगोली तहसीलदार नवनाथ वगवाड, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत विठूबोने हे दोन सरकारी पंच, वजन काटा, फोटोग्राफरसह पिंपळदरी येथील अंबादास सोनटक्के व माधव सोनटक्के यांनी वहिती करीत असलेल्या पिंपळदरी शेत गट क्रमांक 51/ 3 व 51/ 8 मध्ये जाऊन पाहणी केली.
सदरील पाहणी दरम्यान शेत गट क्रमांक 51/ 3 मधील इसम नामे अंबादास सोनटक्के याच्या शेतात शासनाने प्रतिबंधित केलेली गांजाची झाडे ज्याची वजन 19 किलो 158 ग्रॅम असे असलेले (किंमत अंदाजे एक लाख 53 हजार 264 रुपयांचा) मुद्देमाल मिळून आला.
तर शेत गट क्रमांक 51/ 8 मधील इसम नामे माधव सोनटक्के याच्या शेतातील आखाड्यावर एका थैलीत झाडापासून तोडलेल्या गांजाची अर्धवट वाळलेली पाने व फुले ज्याचे वजन एक किलो 796 ग्रॅम (किंमत 35 हजार 920 रुपये) असा एकूण एक लाख 89 हजार 184 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
घटनास्थळावरून पोलिसांनी मिळालेल्या गांजाचा मुद्देमाल व वरील दोन्ही शेतीचे मालक यांना ताब्यात घेतले आहे. नमूद इसमाविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलिस अंमलदार भगवान आडे, गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, नितीन गोरे किशोर सावंत गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, सुमित टाले, शेख जावेद, प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.