मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – भारतात वेदिक कालखंडात मानव मुक्तीचा पहिला लढा तथागत गौतम बुद्ध यांनी यांनी लढला तर स्त्रीमुक्तीचा पहिला अध्याय गौतम बुद्ध यांच्याच कालखंडात त्यांची आई गौतमी यांनी सुरू केला असे प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्यात्या डॉ. आश्लेषा जाधव यांनी हिंगोली येथे साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला कार्यक्रमात केले.
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली च्या वतीने सलग सतराव्या वर्षी आयोजित साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन 17 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान हिंगोली येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृह येथे करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प एकोणावीस फेब्रुवारी रोजी गुंफण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी हिंगोली डॉ. आश्विनी हरिभाऊ सोनुने ह्या होत्या तर उद्घाटक म्हणून राधिका चिंचोलीकर घेरे ताई ह्या उपस्थित होत्या परिवर्तनवादी चळवळीतील महानायक व महानायक व सद्यस्थिती या विषयावर मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. आश्लेषा जाधव यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर शांताबाई मोरे यांची उपस्थिती होती मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याते डॉ. आश्लेषा जाधव यांनी मार्गदर्शन करताना वैदिक कालखंडात मानवमुक्तीचा पहिला लढा हा तथागत गौतम बुद्ध यांनी लढला. तसेच महिलांसाठी हा लढा गौतम बुद्ध यांच्याच कालखंडात त्यांच्या शिष्य त्यांची आई गौतमी यांनी लढल्याचे सांगितले.
या कालखंडात स्त्रीमुक्तीसाठी कुंडलदेशा, यशोधरा, पटाशरा, आम्रपाली यांनीही आपले योगदान दिले. गौतमी यांचा हा लढा पुढे दुसरी महानाई का जिजाऊ यांनी लढला. त्यांनी पुणे येथे येऊन प्रस्थापित समाज व्यवस्थेला हादरे दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून पुढे स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे तथागत गौतम बुद्धानंतर मानव मुक्तीचे दुसरे वाहनायक होत असे त्यांनी सांगितले. सध्याच्या राजकारणावर बोलताना शिवाजी महाराज जेव्हा कळतील तेव्हा जातीपातीची, धर्माची बंधने गळून पडतील असे त्यांनी सांगितले.
पुढे मानव मुक्तीचा लढा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी लढला मुक्ता साळवे यांनी त्यांच्या शाळेत प्रस्थापित समाज व्यवस्थेस आपल्या निबंधातून आम्ही कोण याची विचारणा करून प्रस्थापित समाज व्यवस्थेवर आसूड ओढले असे सांगितले.
आद्य क्रांतिकारक वस्ताद लहुजी साळवे यांना येथील विचारवंत आणि समाज व्यवस्थेने दुर्लक्षित ठेवले आहे. त्यांचे कार्य हे महान असून त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बळवंत फडके, लोकमान्य टिळक यांना आपल्या तालमीत घडवले. तसेच मानव मुक्तीचा लढा लढणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना संरक्षण दिले, असे सांगितले.
पुढे मानव मुक्तीचा लढा हा राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण करून इथल्या शोषित, वंचित स्त्री-पुरुषांना संविधानातून त्यांचे हक्क प्राप्त करून दिले. भारताला संविधान मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले.
त्यानंतर मानव मुक्तीचा लढा हा साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी लढला. ही पृथ्वी नागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी मजुरांच्या तळहातावर तरलेली असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मजूर शोषित वंचितांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा लढला, असे सांगितले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी हरिभाऊ सोनुने यांनी केला.
कार्यक्रमादरम्यान मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड, पत्रकार बबन सुतार, लोकमत समाचार चे दिलीप हळदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी मातंग समाज बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कटके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा हिंगोली यांनी परिश्रम घेतले.