मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड साजरी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सेनगाव तालुक्यात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सध्या सोयाबीन हे पीक काढणीला आलेले असतानाच पुन्हा पावसाने जोर धरला असून अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पावसाच्या पाण्याने सडत आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून थप्पी लावली आहे अशा शेतकऱ्यांचे ही अतोनात नुकसान होत आहे.
आत्तापर्यंत झालेल्या अतिवृष्टीने सेनगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला असून चिंताग्रस्त झालेला आहे. अशा या अडचणीत सापडलेल्या चिंताग्रस्त शेतकऱ्यास शासनाकडून मदत मिळणे गरजेचे आहे.
शासनाकडून जी काही अतिवृष्टी अनुदान जाहीर झालेले आहे ते अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात यावे शेतकऱ्यांची दिवाळी गोड साजरी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.