मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील आशा स्वयंसेविका हे पद या गावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संगणमत करून बोगस व बेकायदा तसेच खोटे दस्त तयार करून भरण्यात आलेले आहे. त्यांनी सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोशींवर कारवाई करण्याची मागणी आजेगाव येथील कुटुंबांनी 2023 पासून केली आहे. मात्र त्यांच्या या न्याय मागणीकडे हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कानाडोळा करत आतापर्यंत त्यांनी याप्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे हे कुटुंब आपल्या न्याय मागणीसाठी 24 जानेवारीपासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले आहे.
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे सेनगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी यांनी 17 मार्च 2023 रोजी काढलेल्या पत्रांवर आजेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी आशा स्वयंसेविका या पदासाठी ठराव देण्यासाठी ग्रामसभा बोलावून ग्रामसभेचा ठराव घेऊन एका उमेदवाराची शिफारस सेनगाव गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे सुचविले होते.
सदरील पत्रात उमेदवाराबाबत काही निकष देण्यात आले होते. मात्र आजगाव येथील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संगणक करून सदरील पदाबाबत कोणतीही ग्रामसभा न घेताच व सदरील पद भरण्याबाबतचे नियम व निकष डावलून तसेच खोटी बनावट दस्त तयार करून ग्रामसभा घेतल्याचे शिफारस करून आजेगाव येथील ग्रामस्थ ग्रामसभा व शासनाची फसवणूक करत आशा स्वयंसेविका या पदासाठी गावातील रूपाली गौतम चाटसे यांची नेमणूक केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले पीडित कुटुंबाने 15 डिसेंबर 2023 रोजी सदरील पदाबाबत घेतलेल्या ग्रामसभेचा ठराव माहिती अधिकारात मागितला असता सदरील ठराव व ग्रामसभा घेतल्याचे सेनगाव पंचायत समिती येथे कुठेही नमूद नसल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सदरील पद हे खोटे दस्त तयार करून भरण्यात आले आहे. अशा रीतीने शासनाची फसवणूक करून दिशाभूल करण्यात आली आहे.
सदरील पदासाठी शालू अंकुश खंदारे यांनी अर्ज केला होता. मात्र त्यांना आतापर्यंत सदरील ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ठराव दिलेला नाही. शालू अंकुश खंदारे यांनी शासनाच्या सर्व निकषांचे पालन करूनही त्यांना या पदापासून आजेगाव येथील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी संगणक करून दूर ठेवले आहे. त्यामुळे सदरील प्रकरणाकडे लक्ष देऊन दोषी गटविकास अधिकारी सेनगाव, आजेगाव येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत हे कुटुंब मागील कित्येक महिन्यांपासून हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदन व उपोषणास बसूनही त्यांच्याकडून कार्यवाही होत नसल्याने हे पीडीएफ कुटुंब 24 जानेवारीपासून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या न्याय हक्कासाठी अमरण उपोषणास बसले आहे.
धक्कादायक! 2012 पासून सेनगाव तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेतल्याचा ठराव पंचायत समितीत नाही!!
अर्जदार व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या शालू अंकुश खंदारे यांनी माहिती अधिकारात माहिती मागविले असता एक जानेवारी 2012 पासून 15 डिसेंबर 2023 पर्यंत सेनगाव तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन त्याचा कार्यवृत्तांत सेनगाव पंचायत समितीत दाखल केला नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. तसेच ग्रामसेवक यांनी सदरील ग्रामसभेचा कार्यवृत्तांत पंचायत समितीकडे पाठविण्याची कायदेशीर जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र 2012 पासून 2023 पर्यंत सेनगाव पंचायत समितीकडे तालुक्यातील एकाही ग्राम पंचायतीने ग्रामसभा घेऊन ग्रामसभेचा कार्यवृत्तांत सेनगाव पंचायत समितीत दाखल केला नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी व उपोषणास बसलेल्या पीडित कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी अमरन उपोषणास बसलेल्या शालू अंकुश खंदारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.