मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर खऱ्या आदिवासींचा 21 डिसेंबर रोजी विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केले आहे.
अधिसंख्य ठरलेल्या बोगस आदिवासी कर्मचार्यांना १४ डिसेंबर २०२२ च्या महाराष्ट्र शासन निर्णयाद्वारे दिलेले संरक्षण, सेवानिवृत्ती लाभ तात्काळ रद्द करावे, सर्वोच्च न्यायालयाने दि. ६ जुलै २०१७ रोजी गैर आदिवासी विरोधात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून अधिसंख्या झालेल्या १२ हजार ५०० पदावर खर्या आदिवासींची नोकरी भरती करावी, नोकरीतील आदिवासींचा अनुशेष भरण्यात यावा.
वनहक्क कायदा २००५-०६ च्यची त्वरित अंमलबजावणी करावी, पेसा कायदा अधिनियम २०१४ ची योग्य अंमलबजावणी करावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, बार्टीच्या धरतीवर आदिवासी विभागामार्फत विद्यार्थ्यांना युपीएससी, एमपीएससी शिक्षणाची योजना राबविण्यात यावी, अशा मागण्यासाठी हा महा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चा हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी केले आहे.