मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कोविड आजाराने मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह सहाय्य प्राप्त करण्यासाठी हिंगोली येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) यांच्या दि. 26 नोव्हेंबर, 2021 च्या शासन निर्णयानुसार कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान वितरीत करणार असल्याचे नमूद करुन सानुग्रह अनुदानासाठी संबंधित व्यक्तींनी शासनाने विकसित केलेल्या www.mahacovid19relief.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्यानुसार अर्जदारांनी ऑनलाईन संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर केलेले आहेत.
परंतु अद्याप काही अर्जदारांना 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य मिळाले नाही अशा नागरिकांच्या बँक खात्याची माहिती मंत्रालय स्तरावरुन मागविण्यात आली आहे. अर्जदारांना या महिन्यात अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
ज्या अर्जदारांना अद्याप 50 हजार रुपये सानुग्रह सहाय्य प्राप्त झाले नाही अशा अर्जदारांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे बँक खाते क्रमांक व बँक स्टेटमेंट माहितीसह उपस्थित राहावे अथवा 9405408939 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.