मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्याचा पदभार घेताच पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर व सर्वसामान्य नागरिकांना संकट समय पोलीस आपल्या सोबती आहेत या संकल्पनेतून अनेक उपक्रम तसेच समाजातील अवैध धंदे व गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष कार्यवाही देखील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल करत आहे.
त्याचाच भाग म्हणून हिंगोली शहर व परिसरात विशेष करून शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी व वसतिगृह या ठिकाणी तसेच शहरातील बस स्थानक रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर व धार्मिक स्थळे व इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणारे छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहेत.
सदर दामिनी पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे, पोलीस अंमलदार माधव बेले, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक केली आहे.
या पथकास एक सुसज्ज चार चाकी वाहन दिले असून सदर पथक दिवसभर व संध्याकाळच्या वेळी शहरातील वरील सर्व ठिकाणी नियमित भेटी देत आहे.
सदर दामिनी पथकास काही माहिती द्यायची असेल तसेच दामिनी पथकाची मदत हवी असेल तर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाकडे एक स्वतंत्र मोबाईल नंबर (8007000493) सुरू करण्यात आला आहे.
सदर मोबाईल नंबर हा दामिनी पथकाकडे राहणार असून त्यात व्हाट्सअप ची सुविधा देखील देण्यात आली आहे. आज रोजी पथकाने शहरातील वरील सर्व ठिकाणी सदर मोबाईल नंबर असलेले जाहिरात आस्थापनेच्या प्रदर्शनी ठिकाणी लावून त्याबाबत संबंधितांना माहिती दिली.
यापूर्वी अनेक वेळा सदर परिसरात टवाळखोरी व छेडछाडीच्या घटना करणाऱ्या विरुद्ध दामिनी पथकाने प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही देखील केलेली आहे. दामिनी पथक शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी व वसतिगृह इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत आपुलकीने संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.
तसेच इतर ठिकाणी सुद्धा महिला व नागरिकांसोबत संवाद साधून पोलीस त्यांच्या मदतीला आहेत हा विश्वास देत आहे.