मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – 2 जानेवारी 2023 पासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरतीला सुरुवात होत आहे. हिंगोली जिल्ह्यातही 21 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे.
सदर पोलीस भरतीसाठी एकूण 1435 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात 1171 पुरुष तर 254 महिला उमेदवार आहेत. सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही 2 जानेवारी ते 4 जानेवारी 2023 दरम्यान संत नामदेव पोलीस कवायत मैदान व मैदानी चाचणीतील 1600 व 800 मीटर धावणे हे अकोला बायपास ते खटकाळी बायपास रोडवर घेण्यात येणार आहे.
सदर रोडवर मैदानी चाचणीच्या काळात वरील तिन्ही दिवशी सकाळी 6 ते 12 यादरम्यान वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने 29 डिसेंबर 2022 रोजी सविस्तर अधिसूचना ही करण्यात आल्या.
हिंगोली जिल्हा पोलीस भरतीसाठी हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक, असे 40 पोलीस अधिकारी व 253 पुरुष व महिला अंमलदार सदर भरती बंदोबस्त कामी नेमलेले आहेत.
30 डिसेंबर 2022 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी नमूद पोलीस भरती बंदोबस्त ड्युटी वाटप व रंगीत तालीम घेऊन आवश्यक त्या सर्व सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश पत्रक देण्यात आलेले आहे.
उमेदवारांनी नमूद प्रवेश पत्रक व आवश्यक सर्व कागदपत्रांसह दिलेल्या दिनांक व वेळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हजर राहावे.
उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये
2 जानेवारी पासून हिंगोली जिल्हा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. सदरील भरतीसाठी उमेदवारांनी कोणतेही आमिष व प्रलोभनाला बळी पडू नये तसेच कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. नमूद हिंगोली जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे नियमानुसार व पारदर्शक होणार आहे असे कळविण्यात आले आहे.