विशेष प्रतिनिधी
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी नुकतीच जाहीर झाली. हिंगोली लोकसभेसाठी 63 टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले. गतवर्षीपेक्षा हा आकडा दोन टक्क्यांनी घसरला आहे. तो यंदा वाढेल ही आशा होती; मात्र तसे काही झाले नाही ‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ या शब्दात योद्धा तानाजी मालुसरे यांनी आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलून कोंढाणा काबीज करण्याची मोहीम फत्ते केली होती. हा इतिहास आहे कर्तव्याचा, जबाबदारीचा. पण यास आता स्मरावे, अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. त्यास कारणही आहे विवेक शून्य झालेले आणि महाराष्ट्र नतदृष्टे राजकारण. याचा वास्तवाशी अलगद संबंध असताना त्यावर पांघरून घालून सर्वसामान्यांना पटेल असे मतदानाच्या दिवशी लग्न तिथी असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे, पण वरील बाब कोणाही विवेकशील व्यक्तीच्या लक्षात सहज येईल...
‘मार्मिक महाराष्ट्र’ने याआधीही ‘दर्पण’ स्तंभात भारतासारख्या लोकशाही देशात मतदान कमी होणे ही चिंतेची बाब असे लिहिले होते. त्यावर आता (मतदानाचा टक्का घटसरल्याने) चिंतन करण्याचीही गरज आहे. चिंतन म्हणले की, आधी राजकीय पक्ष डोळ्यासमोर येतात. कारण कोणास किती जागा मिळाल्या कोण पडले? यात सर्वाधिक रस असतो तो राजकारण्यांसह सर्वसामान्यांना. मात्र तोच सर्वसामान्य आपल्या मतदानाचा हक्क तेवढ्याच जबाबदारीने कर्तव्याने बजावताना दिसत नाही हे नव्याने न सांगितलेले बरे. असो.
हिंगोली लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले. सर्वांनी मतदान करावे यासाठी प्रशासनाकडून ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. परंतु मतदानाचा टक्का काही वाढला नाही.
उलट तो गेल्यावर्षीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरला. त्यास कारण मतदानाच्या दिवशी मोठी लग्न तिथ असल्याचे दिले जात आहे. त्या खालोखाल प्रसार माध्यमांप्रमाणेच प्रशासनालाही उन्हाचा पारा जास्त असल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत, असे वाटणे साहजिकच. मग प्रशासनाच्या मतदान केंद्रावरील उपाय योजना तोकड्या स्वरूपाच्या होत्या हेही यातून पुढे येऊ शकते. असो.
प्रशासनाकडून काही एक ठोस कारण पुढे येईलच असे काही नाही. मतदानाचा टक्का का घसरला? तो वाढला का नाही? हा अधिक गहिरा प्रश्न. आता मतदानाचा असा टक्का वाढवण्यासाठी या आधीच्या केंद्रातील सरकारांनी प्रयत्न केला असेल किंवा नाही यावर काही एक न बोलणे योग्य कारण परिस्थिती सर्वांनाच माहित आहे..
असे असले तरी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या हिंगोली लोकसभेसह परभणी आणि नांदेड लोकसभेच्या निवडणुकांच्या मतदानाचा टक्काही वाढला असे म्हणता येणार नाही. सध्या उन्हाळा असून लग्नसराईचे दिवस आहेत.
फेब्रुवारीपासून तसा उन्हाचा पारा करण्यास सुरुवात होते. चटके मात्र मार्चपासून पुढे मोसमी पाऊस पडेपर्यंत सोसावे लागतात दाट पाऊस पडला की सर्वसामान्यांना दिलासा मिळतो. उन्हाच्या पाऱ्याने मतदान कमी झाले असे सर्वसामान्यांना वाटणे गैर नाही.
पण लग्नसराईच्या हंगामातच योद्धा तानाजी मालुसरे यांनी ‘आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे’ असे म्हणून आपल्या मुलाचे लग्न पुढे ढकलले आणि कोंढाणा मोहीम फत्ते केली. हा कर्तव्याचा, जबाबदारीचा इतिहास महाराष्ट्राला आहे.
हल्ली मतदानाच्या दिवशी वधू – वर मतदान करून ‘सेल्फी’ घेतल्याचे अनेक प्रसंग पहावयास मिळालेले आहेत. हा ट्रेंड होतानाही दिसतोय.
जेव्हा वधू वर मतदानासाठी मतदान केंद्र गाठू शकतात तर वऱ्हाडींना अडचण काय? असा प्रश्नही सहज पडू शकेल. वऱ्हाडींना आपल्या मतदानाच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव नसेल हे कशावरून? पण मतदानाची टक्केवारी जे काही पुढे आली ती चिंता वाढवणारी. त्यास कारण विवेक शून्य आणि राजकारणाची खालवलेली पातळी महाराष्ट्र नतदृष्टे राजकारण. तसेच प्रमुख पक्षांकडून दिलेले जिल्ह्या बाहेरील उमेदवार हेही एक कारण यामागील आहे
हल्ली महाराष्ट्राकडे उत्तर प्रदेश या राज्या खालोखाल सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेले राज्य म्हणूनच पाहिले जात आहे, असेच वाटते. इथल्या विकासाशी शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही एक घेणे – देणे नसणे हेही त्यामागील कारण…