विशेष प्रतिनिधी
अठराव्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मागील दोन दिवसांपासून लागली आहे. सत्ताधारी महायुतीतील राज्यातील बहुतांश ठिकाणच्या जागावाटप संदर्भात चर्चा होऊन जागा वाटप निश्चित झाले असले तरी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ आणि हिंगोली या लोकसभेचा तिढा अजून सुटलेला नाही. तो आज संध्याकाळी दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत या चारही लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महायुतीच्या जागा वाटपात प्रामुख्याने शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, यवतमाळ आणि वाशिम तसेच अमरावती हे लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडावयाचे याबाबत एकमत होत नाहीये. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली तसेच विदर्भातील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांवर शिवसेनेचे मागील अनेक वर्षांपासून अधिराज्य राहिलेले आहे. या मतदारसंघातून सातत्याने शिवसेना उमेदवार निवडून आले होते.
मागील खेपेस मात्र संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारून शिवसेनेचा हा बालेकिल्ला हस्तगत केला होता. त्यामुळे या बालेकिल्ल्यावरून शिवसेनेची पकड सेल झाल्याची चर्चा होती. झालेल्या प्रकारावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना लक्ष करत ते या मतदारसंघात प्रचारासाठी फिरकलेच नाही, असे तेव्हा बोलून दाखवले होते.
या मतदारसंघाला लागूनच जालना लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातून मागील अनेक वर्षांपासून रावसाहेब दानवे हे सातत्याने निवडून येत आहे. त्यांचा फायदा भाजपला संभाजीनगर लोकसभेसाठी होऊ शकतो. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा बीजेपीकडे राहावा असा आग्रह कार्यकर्त्यांचा असल्याचे दिसते. यवतमाळ लोकसभा मतदारसंघ ही सातत्याने शिवसेनेकडेच राहिलेला आहे.
आता सदरील मतदारसंघ हा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. हिंगोली लोकसभा मतदार संघ ही शिवसेनेचाच आहे. या मतदारसंघातून शिवसेना जो उमेदवार देईल तो उमेदवार निवडून येतोच असा इतिहास आहे. सध्या हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहेत.
हिंगोली लोकसभा मतदार संघातून बीजेपीचे तत्कालीन उमेदवार गुंडेवार हे निवडून आले नव्हते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून 1991 वर्षी शिवसेनेत कडून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. तेव्हापासून हा मतदार संघ शिवसेनेचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो.
असे असले तरी निवडून आलेल्या उमेदवारांनी पक्षाला दगा फटका केल्याचा इतिहास आहे; मात्र दगा फटका करणारे पुन्हा निवडून आलेले नाहीत. हे विशेष त्यामुळेच भाजप सदरील मतदारसंघ हा आपल्याला सोडावा असा आग्रह धरत आहे. वाशिम लोकसभा मतदारसंघही या दोन्ही मतदारसंघाप्रमाणेच शिवसेनेकडे राहिलेला आहे.
या मतदारसंघातून सध्या शिवसेना शिंदे गटात असलेल्या भावना गवळी या पुन्हा खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते; मात्र त्यांचा पत्ता कट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. असे असले तरी माजी खासदार भावना गवळी यांनी असे काहीच नसल्याचे सांगून आपणच लोकसभा निवडणूक लढवणार आहोत असेही सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमरावती लोकसभा मतदार संघ हा नवनीत राणा यांच्यासाठी सोडावा असा आग्रह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे; मात्र या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनाच नवनीत राणा नकोयत. त्यांच्या बाजूने स्थानिक भाजपातील पदाधिकारी इच्छुक नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
रामदास पाटील यांनी भाजप दावणीला बांधला – हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासाठी सोडविला जाणार आहे, असे केव्हापासून बोलले जात आहे. भाजपसाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघ सुटल्यास रामदास पाटील हेच उमेदवार राहतील, असे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. असे असले तरी सध्या स्थितीला रामदास पाटील सुलठाणकर यांनी भाजप त्यांच्या दावणीला बांधल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संघ परिवारातील तज्ञ मंडळींकडून टीकाही होत असल्याचे दिसते.
मतदारसंघाकडे लागले सर्वांचे लक्ष – छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ आणि अमरावती या मतदारसंघाच्या वाटाघाटी साठी आज रात्री भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा हे राहणाऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे जाणार असून रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीच दिल्ली येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडीतील उमेदवाराकडेही लागले लक्ष – महाविकास आघाडी कडूनही हिंगोली लोकसभेसाठी कोण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो याकडे जिल्हा वाशिम चे लक्ष लागले आहे शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून आष्टीकर यांचे नाव पुढे येत असून त्यांच्या नावाची चर्चा रंगत आहे.