मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
औंढा नागनाथ – हिंगोली शहरास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने हिंगोली करांना तीव्र उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे ही पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने सिद्धेश्वर हा रस्ता बंद केल्याने प्रवाशांसह ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने त्यांना अडकून पडावे लागत आहे.
हिंगोली शहरास सिद्धेश्वर धरणातून पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाईपलाईन सिद्धेश्वर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गांगलवाडी सिद्ध नदी येथे वारंवार फुटत आहे. सदरील पाईपलाईनची या ठिकाणची दुरुस्ती वारंवार करूनही पहिले पाढे 55 असे म्हणण्याची वेळ हिंगोली नगरपरिषद प्रशासनाने ओढावून घेतली.
या ठिकाणी पावसाळ्यातही पाईप लाईन फुटते किंवा वाहून जाते. तर आता उन्हाळ्यातही हे पाईपलाईन फुटत आहे. त्यामुळे तीव्र उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे आधीच हिंगोली नगरपरिषदेकडून पाच – पाच ते सहा – सहा दिवसात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात आता ना दुरुस्त पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी काही दिवस लागत असल्याने हा पाणीपुरवठा दहा – दहा ते तेरा – तेरा दिवस बंद पडत आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
तीव्र उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून खाजगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. या पाईपलाईनने हिंगोलीकरांची हे व्यथा केलेली असताना आता दुसरीकडे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आणि प्रवाशांना यांना दुरुस्त पाईप लाईन चा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी सिद्ध नदी गांगलवाडी येथे रस्ता बंद करण्यात आला असून पर्यायी रस्ते अभावी प्रवाशांना आणि ग्रामस्थांना सिद्धेश्वर कडे जाता येत नसून सिद्धेश्वर कडील प्रवासी आणि ग्रामस्थांना हिंगोलीकडे येता येत नाही. त्यामुळे ते जिथे तिथे अडकून पडत आहेत.
हिंगोली नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन ही पाईपलाईन कधीही नादुरुस्त होणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच भर उन्हाळ्यात हिंगोली नगरपरिषदेकडून केला जाणारा पाणीपुरवठा हा उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दोन ते तीन दिवसाआड करावा, अशी मागणी ही केली जात आहे.