मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी:-
हिंगोली – हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली देशात सर्व परिचित आहे, मात्र हळदीला जीआय मानांकन नव्हते याबाबत ‘मार्मिक महाराष्ट्र’ने 11 डिसेंबर 2023 रोजी दर्पण या स्तंभात लिखाण केले होते. त्याची दखल घेऊन भारत सरकार भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री कार्यालयाकडून हिंगोलीच्या हळदीला जीआय मानांकन प्रदान करण्यात आले आहे. ‘वसमत हळदी टर्मरिक’ असे त्यास नाव देण्यात आले आहे.
देशात हळद उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्यास ओळखले जाते. हिंगोलीची हळद कोरोना काळात अरब ‐ अमिराती राष्ट्रात गेलेली आहे.
तसेच हळदीला राज्यासह आंतरदेशीय बाजारपेठेतही मोठी मागणी असते. अशा या हळद उत्पादक जिल्ह्यात हळदीलाच जीआय मानांकन नव्हते. याबाबत ‘मार्मिक महाराष्ट्र’ने 11 डिसेंबर 2023 रोजी दर्पण या स्तंभात विवेचन पूर्ण लिखाण केले होते. त्याची दखल घेऊन हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावास मान्यता मिळाली असून भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्री कार्यालयाकडून हिंगोलीच्या हळदीला वसमत हळदी टर्मरिक असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असून हिंगोलीची हळद आता यापुढे या नावाने सर्व ओळखली जाणार आहे.
हळद लागवडी खालील क्षेत्र वाढवणार –
मागील दोन ते तीन वर्षांपासून जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या हळदीला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. गतवर्षी हळद लागवडीखालील क्षेत्र 24 हजार हेक्टर एवढे होते त्यात यंदा 10 हजार हेक्टर ची वाढ करणार असून हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र 34 हजार हेक्टर एवढे करणार आहे, असे हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी ‘मार्मिक महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले. हळद लागवडी खालील क्षेत्र वाढले तरी हळदीला जीआय मानांकन मिळाल्याने त्यावरील प्रक्रिया उद्योग वाढतील आणि दर ही चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.