Marmik
Hingoli live Love हिंगोली News

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार कायद्याची होळी! अंमलबजावणी होत नसल्याने केला निषेध

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलदगती न्यायालयामार्फत चालवावे तसेच आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशा विविध मागण्या घेऊन हिंगोली येथे पत्रकार संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकार कायद्याची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करत विविध घोषणा देऊन पत्रकारांनी निषेध केला.

महाराष्ट्रात 8 नोव्हेंबर 2019 पासून पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे. हा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ही बाब पत्रकारांसाठी अभिमानास्पद आहे.

महाराष्ट्राचा हा कायदा पुरेसा सक्षम आणि चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तो कुचकामी ठरला आहे. राज्यात गेल्या चार वर्षात जवळपास 200 पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना धमक्या शिवीगाळ केली गेली आहे.

मात्र केवळ 37 प्रकरणातच पत्रकार संरक्षण कायदा लागू केल्याने आणि त्यातील एकाही प्रकरणात आरोपीला शिक्षा न झाल्याने या कायद्याची उपयुक्तता संपली असून कायद्याची भीतीच समाजकार्तकांच्या मनात उरली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चिंता वाटावी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.

अलीकडेच पाचोरा येथील एका पत्रकारास आमदार किशोर पाटील यांनी आधी शिवीगाळ केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या गुंडांकरवी त्यांच्यावर हल्ला चढविला हे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले ऐकले आहेत.

असे असले तरी मारहाण करणाऱ्या गुंडावर किंवा शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या आमदार किशोर पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला नाही.

पत्रकारांवर जे हल्ले होतात त्यातील 75 टक्क्यांवर हल्ले हे राजकीय पक्षांच्या नेत्याकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतात हे वास्तव आकडेवारीसह समोर आलेला आहे.

मग अशा प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतात आणि पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम न लावता साधी अदखलपात्र गुन्हा दाखल करून हा विषय बंद करून टाकतात, असे प्रकार वारंवार आणि सर्वत्र दिसून येत आहेत. हे थांबलं पाहिजे आणि पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करता आलं पाहिजे, अशी रास्त मागणी यावेळी करण्यात आली.

पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आमदार किशोर पाटील यांच्या आर्यरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील 11 प्रमुख पत्रकार संघटनांच्या सर्व पत्रकार 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात हे आंदोलन होत आहे.

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, प्रकाश इंगोले, प्रद्युम्न गिरीकर मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य संपादक गजानन जोगदंड, विलास जोशी, बाबाराव ढोकणे, अरुण दिपके, केशव भालेराव, अनिस अहमद, गजानन थोरात, गजानन लोंढे, कन्हैया खंडेलाल, सुधीर गोगटे, शेख मुर्तुजा, अब्दुल हफिज, निलेश गरवारे, संदीप बोरकर, विजय गुंडेकर, सुनील पाठक, सुनील प्रधान, भगवान इंगोले, मार्मिक महाराष्ट्र औंढा नागनाथ तालुका प्रतिनिधी मनोज जयस्वाल, श्रीरंग क्षीरसागर, शांताबाई मोरे, संदीप नागरे, गजानन वाणी, गजानन पवार, मनीष खरात आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सरकारकडे प्रमुख दोन मागण्या

महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांनी शासनाकडे प्रामुख्याने दोन मागण्या मांडल्या आहेत त्या म्हणजे पत्रकारावर हल्ला झाल्यानंतर पोलीस पत्रकार संरक्षण कायद्याचं कलम लावायला टाळाटाळ करीत असतील तर संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही व्हावी जेणेकरून अंमलबजावणीतील मुख्य अडसर दूर होईल.

तसेच पत्रकारांवरील हल्ल्याचे सर्व खटले जलद गती न्यायालयामार्फत चालविण्यात यावेत जेणेकरून पत्रकारांना न्याय मिळेल, अशा दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

Related posts

जिल्ह्यातील बेकायदेशीर व अवैध कत्तलखाने, मांस विक्री कायमस्वरूपी बंद करा, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश

Santosh Awchar

सोशल मीडियावर आक्षेपार्य मजकूर टाकणाऱ्या 11 जणांवर कारवाई, सायबर सेल विभागाने अकाउंट केले बंद!

Santosh Awchar

रानकवी विसावला! पद्मश्री ना. धो. महानोर यांचे निधन

Gajanan Jogdand

Leave a Comment