मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे 10 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान नेवरी येथील हॉटेल चालक व बाळापूर येथील सूर्या बार व्यवस्थापक व अन्य चार जणांनी महामार्गावर एकाच बेदम मारहाण करून त्याच्याकडील जबरीने रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला. या प्रकरणाचा अवघ्या चार तासात पोलिसांनी छडा लावून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
10 ऑगस्ट रोजी फिर्यादी राजेश पांडुरंग अवचार (वय 37 वर्षे रा. भोसी तालुका कळमनुरी) यांनी व इतर तीन साथीदारांनी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आखाडा बाळापुर कडून भोसी या गावी जात असताना तीन मोटार सायकल वरील सहा दरोडेखोरांनी फिर्यादीचा रस्ता अडवून चाकूने मारहाण करून जबरीने रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतल्या बाबत आखाडाबाळापुर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती.
या अनुषंगाने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली.
दरोड्याबाबत माहिती मिळताच हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत संदिपान शेळके व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पंडित कचवे यांना सूचना देऊन दरोडेखोरांचा पाठलाग करून पकडण्याबाबत सांगितले.
आखाडा बाळापूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे वेगवेगळे पथक रवाना झाले. दरोडेखोर दरोडा टाकून नांदेडच्या दिशेने जात असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी दरोडेखोरांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
पोलीस पाठलाग करीत आहेत हे दरोडेखोरांना समजतात मोटारसायकली रोडवर सोडून चार दरोडेखोर पारडी तालुका अर्धापूर शेतशिवाराने पळ काढला. पोलिसांनी सदर परिसराचा कसून शोध घेतला असता अंधारात दबा धरून बसलेले सौरभ माधवराव गायकवाड (वय 25 वर्ष व्यवसाय नेवरी येथील हॉटेल सातबारा चालक रा. बाळापुर), ज्ञानेश्वर सदानंद सोळंके (वय 24 वर्ष व्यवसाय सूर्या बार बाळापूर येथील मॅनेजर रा. हस्तरा तालुका हदगाव), अभय किरण कडणे (वय 25 वर्षे रा. बाळापुर), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (वय 25 वर्षे रा. मोजमा मंदिर जवळ दत्तनगर नांदेड) असे चार दरोडेखोर मिळून आले. इतर दोन साथीदाराचे नाव विचारले असता ओमकार कांबळे (रा. नमस्कार चौक नांदेड) व विनायक (रा. नांदेड) असे सांगितले.
दरोडेखोरांकडून चोरलेले व गुन्ह्यात वापरलेले पाच मोबाईल व रोख रक्कम, तसेच बोलण्यात वापरलेले तीन मोटार सायकल, असा एकूण दोन लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे भादविसह कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार हे करत आहेत.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना, पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, पोलीस अंमलदार मधुकर नागरे, नागोराव वाभळे, शिवाजी पवार, प्रभाकर भोंग, राजेश मुलगीर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गणेश लेकुळे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, दत्ता नागरे, दीपक पाटील यांनी केली.
या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन केले.