Marmik
दर्पण

राज्य सरकार संघ पुरस्कृत कसे..?

विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

अगदी अलीकडे खा. शरदराव पवार ह्यांनी म्हणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केली. शरदराव अधून – मधून ती करत असतात. पण अगदी अलीकडे काही स्वतःला पत्रकार म्हणून घेतात, पण समाजाला दिशा दाखवण्या ऐवजी ते समाजाची दिशा भरकटविण्याच काम करत असतात असे काही पत्रकार, जाहीरपणे सांगतात की, हे राज्य सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्यावर निवडून आलं! विश्वंभर चौधरी, राजू परुळेकर ह्यांना तर केवळ संघाला शिव्या घालायला मिळतात ना तेवढही पुरेस असतं. ह्या दोघांनी तर संघानेच उमेदवार निवडले होते, संघानेच त्यावर शिक्का मोर्तब केला, संघचं प्रचारात उतरला, संघानेच वक्ता ठरवला, संघानेच कोणत्या मतदार संघात कोण पाठवायचे हे ठरवले आणि संघानेच मुख्यमंत्री केला, इथपर्यंत बोलून मोकळे झाले. म्हणजे हे सरकार केवळ संघाच्याच पाठिंब्यावर निवडून आले असे ते म्हणतात. सरकारला संघ पुरस्कृत ते ठरवतात…

आजपर्यंतच्या संघाच्या सर्वच सरसंघचालकांनी सांगितल आहे “संघ काहीही करणार नाही, आणि स्वयंसेवक काहीही सोडणार नाही”. संघ राजकारण करणार नाही, मात्र स्वयंसेवक त्यांचा त्याचा निर्णय घेऊ शकतात”. इतकी संघाची स्पष्ट भूमिका असताना ह्या पत्रकारांना संघाला बदनाम करण्यासाठी कारण हवी असतात. संघ निवडणुकीत केवळ मतदार जागृती करतो. आणि ते ही आवश्यक आहे. राजकिय मंडळींना सामान्य जनता कंटाळली आहे, त्यांच्यावर फारसा विश्वास सामन्यांचा राहिला नाही. त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाचा मागील चार – सहा वर्षात झालेला चिखल पाहता सामान्य मतदार स्वतःला मतदानापासून दूर ठेवत होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिला आहे. महाराष्ट्रात एकंदरीत साठ टक्केपेक्षा कमी मतदान झालं होत. कोणत्याही माणसाने स्वतःला मतदानापासून दूर ठेवू नये म्हणून संघ आणि संघस्वयंसेवक मतदान जागृती करत होते.

संघ स्वयंसेवक मतदान जनजागृती करताना, मतदान कोणाला करा हे कधीही सांगत नाहीत. अर्थात जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांना ते कळत. फक्त रस्ता दाखवायचा असतो आणि तेच काम संघ स्वयंसेवक करत असतात. ती जागृती कुणाच्या पथ्यावर पडेते ह्याची काळजी संघ कधीही करत नाही.भ्रष्टाचार करणाऱ्यांना दूर ठेवा, गुंडगिरी करणारा सत्तेत नको, राष्ट्रभक्त माणूस निवडून द्या, देशाची अस्मिता जपणारा माणूस पुढे आणा, तरुणाईला आदर्श ठरेल असा व्यक्ती समोर करा, असं सांगणे म्हणजे हा राजकीय द्रोह आहे का?

परुळेकर, चौधरी आणि मागे मागे असीम सरोदे, अगदी सरसंघचालकांना आपला मित्र म्हणवणारे सुरेश द्वादशीवार ह्यात मागे नसतात. ह्यांना ना संघ माहिती असते ना संघाची शाखा. मात्र ह्यांचा दावा संघ सरसंघचालकांच्या पेक्षा जास्त समजल्याचा करतात. पत्रकारांनी आपली वाट चुकल्यावर देखील संघस्वयंसेवक कान धरतील, ते ही समाजाच काम आहे. स्वयंसेवक तिथेही कमी नाही पडणार. कारण जे जे म्हणून राष्ट्र हिताचं आहे, समाज हिताचं आहे ते ते संघस्वयंसेवक करत राहतील ह्यात शंका नाही.

संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसचे विदर्भाचे सरचिटणीस राहिलेले आहेत. राष्ट्रभक्तीची वाट ज्या मार्गाने अधिकाधिक बळकट होत जाईल, होत जाते त्या मार्गाने संघ आणि स्वयंसेवक जातो आहे. हे मागील शंभर वर्षापासून अविरत सुरू आहे. काँग्रेसची सत्ता असताना पाकिस्तानने १९४८ मध्ये जेंव्हा पहिल्यांदा हल्ला केला तेंव्हा संघ स्वयंसेवक सर्वात पुढे होता. १९६२ चीन युद्धा नंतर संघ कार्यकर्ता मंडळीचा आणि त्यांच्या केलेल्या कामाचा गौरव तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू करतात. १९७१ मध्ये युद्धात देखील संघाची भूमिका होतीच, ही सर्व सरकार काँग्रेसची असताना संघ पुढे होता हे तथाकथित पत्रकार मुद्दामहून विसरतात.

१९९९ मध्ये देखील वाजपेयी सरकार असताना कारगिल मध्ये सैनिकांची मदत संघ स्वयंसेवकांनी केल्याचा इतिहास आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत संघ परिवार सर्वात पुढे असतो. देशाच्या जडणघडणीला महत्वाचा आधार जेंव्हा जेंव्हा असावा असं संघाला वाटतं संघ तेंव्हा तेंव्हा सर्वात पुढे असतो. ह्या देशाला चांगल्या मार्गाला नेणारी व्यक्ती, ह्या राष्ट्राला वैभव संपन्न करणारे पुढारी असावेत, असं स्वयंसेवकांना वाटत असेल तर त्याला संघ पुरस्कृत सरकार म्हणणार का..? असा प्रश्न पडतो.

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

शाळांत आमची मुले घेता का मुले…

Gajanan Jogdand

लोकसभा निवडणूक : गावखेडी विकासाच्या टप्प्यात येणार कधी?

Gajanan Jogdand

नद्यांना हलक्यात किती घेणार?….

Gajanan Jogdand

Leave a Comment