गणेश पिटेकर
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम अंतर्गत देशातील नद्यांच्या पाण्याचा अभ्यास केला. त्याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात 603 पैकी 311 नद्यांचे काही भाग प्रदूषित आढळला…
नद्यांच्या खोर्यात विविध मानवी संस्कृती उदयास आल्या आहेत. खळखळून वाहणाऱ्या या नद्या आज गटार झाल्या आहेत. बर्याच जणांचा त्यांच्याशी दुरान्वय संबंध येत नाही. जो काही येतो तो धार्मिक विधीशी संबंधित. पण त्या नंतर तिच्याकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. म्हणजे आपलं आणि तिचं नात संपत. आपल्या जीवनात आणि निसर्ग परिसंस्थेत तिचं अनन्य साधारण महत्त्व आहे.
नद्यांवर बंधारे, धरणे बांधली जातात. त्यातून शहरे व गावांना पाणीपुरवठा केला जातो. ती आपल्याला निरंतर स्वच्छ पाणी देत आली आहे. मात्र आपण करतो काय? नदी म्हणजे केवळ पाणी नव्हे. त्यात प्राणी, वनस्पती खूप काही खजिना आहे. पण आपलं मजेत चालू आहेना मग! कशाला त्या नदीची काळजी घेऊ…
काही दिवसांपूर्वी कार्तिकी एकादशीनिमित्त आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडले गेले. यामुळे दूषित पाणी वाहून गेले व भाविकांना स्नान करता आले. मात्र नदी प्रदूषणाचा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन काही नियोजन करताना दिसत नाही.
नद्यांमध्ये दूषित पाणी सोडलं जात. पण आपल प्रशासन आणि सरकार निष्क्रियपणे हे सर्व पाहात बसते. जनतेला ना आपल्या नदीची काळजी ना दु:ख. मात्र स्वयंसेवी संस्था आणि काही लोक वैयक्तिक पातळीवर काम करत आहेत.
जल पुरूष राजेंद्रसिंह राणा यांनी नद्यांबाबत मोठ्ठ काम केलं आहे. त्यांच आपण ऐकायला हवं. नद्या आणि मानवाचं नात अतूट आहे. ते भारतात आजची बहूतेक तीर्थक्षेत्रे नदीकाठी आहेत. यातून आणि पौराणिक कथेतून स्पष्ट होते.
नद्यांकडे डोळसपणे पाहणे आपण कधीच सोडून दिले आहे. आपण एखाद्या नद्यांवरील पुलावरून जाताना जाणीव होते की ही नदी किती प्रदूषित झाली आहे. इतक आपण तिच्यापासून फार दूर गेलो आहोत. नद्या स्वच्छ ठेवल्या पाहिजेत ही काळाची गरज आहे. मात्र, त्या कशा प्रदूषित होतील यात आपला सहभाग वाढत चालला आहे. नद्यांमध्ये घाण टाकताना काहीच का वाटत नाही?असा साधा प्रश्नही पडत नाही. म्हणजे आपण बधीर झाल्याचे चिन्ह आहे.
नदी फक्त वाहते हा बहुतेकांचा चुकीचा गैरसमज असू शकतो. ती स्वतः एक जीवसृष्टी असलेले एक वेगळ विश्व आहे. त्याच महत्त्व कळत नाही. हेच दुर्दैव आहे. पुणे शहराला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होतो. मात्र आसपासच्या परिसरातून दुषित पाणी धरणात सोडले जात आहे. मात्र शहर, जिल्हा आणि परिसरातील स्थानिक प्रशासन किती गंभीर आहे हे यावरून दिसून येते.
थोडक्यात काय तर आपण आपल्या नद्यांचा जीव घेत आहोत. तिच्या मुक्त व स्वच्छंदी वाहण्यावर निर्बंध आणले गेले आहे. तिचा श्वास घोटला जात आहे. याकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही. माणसाचा स्वार्थ महत्त्वाचा की नदी यातून एकाची निवड करण्याची वेळ आली आहे.