मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील दिग्रस कराळे लोहगाव येथील शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मानव विकास बस वेळेवर येत नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. तसेच अनेकदा बस उशिराने येत असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आगाराकडून दिग्रस कराळे लोहगाव येथील विद्यार्थ्यांसाठी मानव विकासची बस सोडली जाते.
सदरील एसटी बस ही येथे वेळेवर पोहोचत नाही. सदरील बसणे भोसी, करंजाळा, नागझरी तसेच दिग्रसकराळे आणि लोहगाव येथील मुली – मुले शिक्षणासाठी हिंगोली येथे येतात.
मात्र सदरील मानव विकासची बस ही वेळेवर येत नसल्याने या विद्यार्थ्यांना पाण्या- पावसात तसेच ऊन – वारा अंगावर घेत पायपीट करावी लागते.
आपले शैक्षणिक नुकसान या विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने हिंगोली गाठावी लागते. अनेक विद्यार्थ्यांकडे खाजगी प्रवासी वाहनाने ये – जा करण्याचे पैसे देखील नसतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घरी बसावे लागते.
सदरील बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व हिंगोली आगार प्रमुख यांनी हिंगोली ते लोहगाव, हिंगोली ते भोसी अशा मानव विकासच्या बस फेऱ्या वाढवाव्यात व सदरील बसेस वेळेवर सोडाव्यात अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांतून केली जात आहे.