मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे प्रवाशांना थांबण्यासाठी प्रवासी निवारा नसल्याने शालेय मुलीवर महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या ठिकाणी प्रवासी निवारा उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी 6 जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला कुरुंदा ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव आहे. गावात नरहर कुरुंदकर उच्च माध्यमिक शिक्षण संस्था, जिल्हा परिषदेची शाळा, 33 केव्ही उपकेंद्र, मोठी बाजारपेठ असे सर्वच असल्याने गावात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये बाहेरगावातील मुला – मुलींचा देखील सहभाग आहे.
आलेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना थांबण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत रस्त्यावर बसची वाट पाहत उभे राहावे लागते. यामध्ये महिला आणि मुलींची मोठी गैरसोय होते.
या ठिकाणी प्रवासी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी याआधीही प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते; मात्र कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेवटी त्रस्त होऊन या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला कुरुंदा ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.