मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तालुक्यातील भांडेगाव शिवारात प्रवासातील पती – पत्नी यांना अडवून त्यांच्याकडील जबरीने दागिने व नगदी रुपये चोरून नेणारे तीन आरोपी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडून जेरबंद केले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व नगदी 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
6 ऑगस्ट 2023 रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत भांडेगाव येथील फिर्यादी हे त्यांचे पत्नी व मुलासह मोटार सायकलवर भांडेगाव येथे जात असताना खंडाळा ते भांडेगाव जाणाऱ्या रहदारीच्या रोडवर रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास पाठीमागून तीन अज्ञात आरोपीने येऊन फिर्यादी यांची मोटारसायकल अडवून फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच फिर्यादी यांच्याकडील नगदी रुपये जबरीने चोरून नेल्याची घटना घडली होती.
याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि अन्वय गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा उघड करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शित केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा लाखी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील प्रशांत भीमराव वाणी व अमर रामदास दुमारे यांनी त्यांचे साथीदार ज्ञानेश्वर विश्वनाथ ढगे (रा. सुपळी तालुका जिल्हा वाशिम) यांच्यासह मिळून केल्याची तपास पथकाला माहिती मिळाली.
यातील लाखी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथील प्रशांत भीमराव वाणी व अमर रामदास दुमारे यांना वाशिम ग्रामीण पोलीस ठाणे यांनी त्यांच्या हद्दीतील गुन्ह्यात अटक केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नमूद दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्यातील गुन्ह्यात सहभागी तिसरा आरोपी नामे ज्ञानेश्वर विश्वनाथ ढगे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्यास आज रोजी पोलीस पथकाने हिंगोली शहरातून सापळा रुचून सीताफिने ताब्यात घेतले.
नमूद आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी वरील नमूद गुन्हा केल्याची कबुली दिली. तपासात नमूद आरोपींकडून गुन्ह्यात त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीचे जबरीने चोरून नेलेले दागिने व रक्कम जप्त करण्यात आली.
यावेळी या दरोडेखोरांकडून 15 हजार रुपयांची एक पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जुने वापरते (किंमत अंदाजे), तीन हजार रुपये एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे ओम जुने वापरते (किंमत अंदाजे), 500 रुपये नगदी 100 रुपयाच्या पाच नोटा असा एकूण 18 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पोलिस अंमलदार दीपक पाटील, दत्ता नागरे, इरफान पठाण सायबर सेल हिंगोली यांनी केली.