मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी व सर्व नागरिकांनी सर्व जाती-धर्माचा सन्मान व आदर राखून एकट्याने राहावे सामाजिक सद्भावना वाढावे या दृष्टीने हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलांतर्गत कौमी एकता क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पोलीस अधीक्षक कार्यालयाने विजेतेपद पटकावले तर बासंबा पोलीस ठाणे संघ उपविजेता ठरला. यावेळी आकर्षक व जल्लोषपूर्ण वातावरणात विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
सदर स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 13 पोलीस ठाणे व जिल्हा पोलीस मुख्यालय येथील तीन असे एकूण 16 संघात 21 डिसेंबर ते 29 डिसेंबर या दरम्यान संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे सदरच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सदरील सर्व संघात पोलीस ठाणे शाखेचे सहा खेळाडू तर इतर पाच खेळाडू हे त्या – त्या पोलीस स्टेशन हद्दीतील विविध जाती-धर्मातील युवक खेळाडू यांचा समावेश होता.
29 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय विरुद्ध बासंबा पोलीस ठाणे या दोन संघात स्पर्धेतील अंतिम सामना खेळविण्यात आला. सदर दोन्ही संघात तुल्यबळ सामना होणार असल्याने प्रेक्षकांनीही मोठ्या प्रमाणात मैदानावर हजेरी लावलेली होती. सदरचा सामना एकूण बारा शतकांचा खेळविण्यात आला.
नाणेफेक जिंकून बासंबा पोलीस ठाणे यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पोलीस अधीक्षक संघाकडून कर्णधार पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व सोनू गौड यांनी सलामीला येऊन तुफान फटकेबाजी करून संघाला मजबूत धावसंख्या उभारण्यात मदत केली.
सोनू गौड यांनी वैयक्तिक 99 धावांची खेळी केली तर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी 33 धावांची खेळी केली. पोलीस अधीक्षक कार्यालय संघाने निर्धारित 12 षटकांमध्ये १६७ धावांचा डोंगर उभारला प्रतिउत्तरात बासंबा पोलीस ठाणे यांनीही अतिशय तुफान फटकेबाजी करून सामन्यात रंगत आणली.
शेवटपर्यंत सामना कधी एका बाजूने तर कधी दुसऱ्या बाजूने झुकत होता. बासंबा पोलीस ठाणे संघाकडून ज्ञानेश्वर शिंदे यांनी धावांची आतिषबाजी करत ४६ धावा काढल्या तर अंतिम षटकात विजयासाठी 29 धावांची गरज असताना पोलीस अधीक्षक कार्यालय संघाकडून गोलंदाजीची जबाबदारी स्वतः टीमचे कर्णधार जी. श्रीधर यांनी घेतली.
परंतु अशक्य असे वाटत असतानाच राजू जाधव या फलंदाजाने चार उत्तुंग षटकार मारून सामना पोलीस स्टेशन बासंबा यांच्या बाजूने करतानाच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अतिशय चालाखीने गोलंदाजी करत शेवटी एका धावाने पोलीस अधीक्षक कार्यालय संघाला विजय मिळवून दिला.
धावांचा पाठलाग करताना बासंबा पोलीस ठाणे यांनी निर्धारित 12 षटकात 166 धावा करू शकले. सदर सामन्यात गोलंदाजी निष्प्रभ ठरवताना दोन्ही संघातील फलंदाजांनी भरपूर धावा काढल्या.
दोन्ही बाजूने 12-12 असे 24 षटकात सरासरी 14 प्रमाणे दोन्ही संघांनी मिळून तब्बल 323 धावा काढल्या. दोन्ही संघाकडून उत्तुंग असे 30 षटकारांची अतिशबाजी करण्यात आली व प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले. सामन्यानंतर अतिशय जल्लोषात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास हिंगोली चे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, हिंगोली तहसीलदार नागनाथ वगवाड, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद मुंढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे इतर पोलीस अधिकारी व अंमलदार, पत्रकार यांची उपस्थिती होती.
सुरुवातीस पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर कौमी एकता क्रिकेट स्पर्धा आयोजना मागची भूमिका व त्याचे महत्त्व सविस्तर विशद केले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पुरस्कारांचे सविस्तर वर्णन पुढील प्रमाणे,
विजेता संघ – पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली
उपविजेता संघ – पोलीस ठाणे बासंबा
अंतिम सामना सामनावीर – नरेंद्र उर्फ सोनू बालकिशन गौड
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज – नरेंद्र उर्फ सोनू बालकिशन गौड
स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज – सुरेश भगवानराव भोसले पोलीस उपनिरीक्षक बासंबा पोलीस ठाणे
स्पर्धेतील उत्कृष्ट विकेटकिपर – विकी गोविंद कुंदनानी पोलीस हवालदार हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी मालिकावीर – नरेंद्र उर्फ सोनू बालकिशन गौड
वरील विजेता संघ उपविजेता संघ व वैयक्तिक पुरस्कार प्राप्त सर्वांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक असे ट्रॉफी चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेत पंच व समालोचक शेख रशीद,मोसिन खान पठाण, सुमित बास पोईनल्लू, बालाजी गायकवाड, निवेश गोरे, नरेश पुरी, सोनू घोळवे, अतुल शेळके, विनय राजपूत यांचाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.