मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
औंढा नागनाथ – तालुक्यातील सिद्धेश्वर येथील आयुष्यमान आरोग्य केंद्राचे मोठ्या थाटात आणि गाजावाजा करत उद्घाटन करण्यात आले. मात्र उद्घाटन झालेल्या या आरोग्य केंद्रात केवळ दोन अधिकारी आणि एक पारिचारिका असल्याचे समजते. त्यातही हे आरोग्य केंद्र उद्घाटन झाल्यानंतरही बंद अवस्थेत असून या ठिकाणी पाणी व वीजही उपलब्ध नाही. त्यामुळे हे आरोग्य केंद्र नेमके कोणत्या उद्देशासाठी आणि कोणासाठी कार्यरत केले असा सवालही उपस्थित केला जात आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर पासून एक किलोमीटर अंतरावर शासनाकडून लाखो रुपये खर्चून आयुष्यमान आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. या आरोग्य केंद्रास नंदगाव, ढेगज, वरचुना, दूरचुना, सावंगी, पाताळवाडी, भोशी, गांगलवाडी यासह इतर 30 ते 35 गावे जोडण्यात आली.
मात्र उद्घाटन झाल्यानंतर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या आयुष्यमान आरोग्य केंद्रात सध्या केवळ दोन अधिकारी आणि एक पारिचारिका आहे. हे अधिकारी आणि कर्मचारी ही येथे एखाद वेळेस जात असल्याचे दिसते. त्यामुळे बहुतांश वेळा हे आरोग्य केंद्र कुलूप बंद असते. त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना उपचार न घेताच येथून परतावे लागत आहे. हे आरोग्य केंद्र कधीही कुलूप बंद अवस्थेत असल्याचे आढळून येत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या या आरोग्य केंद्राकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या आरोग्य केंद्रात पिण्याचे पाण्याची सोय नाही. तसेच वीजही उपलब्ध नाही. त्यामुळे या भौतिक सुविधाही रुग्णांना मिळत नाहीत. हे आरोग्य केंद्र बंदावस्थेतच राहत असल्याने या सुविधांबाबतही आरोग्य विभागाने चुप्पी साधली आहे.
या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांची कान उभारणी करत सिद्धेश्वर आयुष्यमान आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.