मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून पोलीस मुख्यालय हिंगोली येथील पोलीस कवायत मैदानाची शोभा वाढविणारा तसेच परेड मार्चसाठी आवश्यक असलेला भव्य असा किल्ला बांधण्यात आला आहे.
तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी सवलतीच्या दरामध्ये घरगुती संसार उपयोगी सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पोलीस कल्याण सबसिडअरी कॅन्टीन व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नागरिकांच्या सुविधेसाठी नागरिकांचे प्रकरणे जलद गतीने व योग्य मार्गदर्शनाने पूर्ण होण्यासाठी नव्याने नागरी सुविधा केंद्राचे निर्माण केले गेले आहे.
सदर नागरिक सुविधा केंद्रात स्वतंत्र चारित्र पडताळणी कक्ष जिल्हाधिकारी हिंगोली व पोलीस अधीक्षक हिंगोली यांच्या संयुक्त संकल्पनेतून पोलीस विभाग महसूल विभाग व विधी विभाग यांची एकत्रित मिळून प्रॉपर्टी सेल निर्माण करण्यात आली आहे. सदर प्रॉपर्टी सेलचा मुख्य उद्देश म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे तक्रार अर्ज हे शेतीशी संबंधित तसेच जमिनीच्या वादाशी संबंधित असतात.
अशावेळी सदरचे अर्ज प्रॉपर्टी सेल कडे आल्यानंतर नागरिकांना त्यांच्या शंकाचे निरसन सहज होईल व सदर सेलकडून त्यांना त्यांच्या अर्जानुसार त्यांचा प्रश्न कुठून व कसा सोडवावा याबाबतची कार्यवाही यासाठी मार्गदर्शन मिळेल. या प्रॉपर्टी सेल विभागात पोलीस अधिकारी महसूल विभागातील अधिकारी व विधी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सदर पोलीस कवायत मैदानावरील नव्याने बांधण्यात आलेला किल्ला, पोलीस सबसिडअरी कॅन्टीन व नागरी सुविधा केंद्रांचे उद्घाटन 10 ऑक्टोबर रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली चे संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर पोतरे, उप अभियंता माधव देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव व पोलीस अधिकारी तसेच अंमलदार यांची उपस्थिती होती.