Marmik
Hingoli live

जिल्हाधिकाऱ्यांकडून जलेश्वर तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत हिंगोली येथील जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम मागील दोन महिन्यापासून चालू आहे. या गाळ काढण्याच्या कामाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ या योजनेतंर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून कमाल 37 हजार 500 रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले आहे. 

यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी अनंत जवादवार, जलसंधारणचे उपअभियंता प्रफुल्ल खिराडे, नगर अभियंता रत्नाकर अडसिरे, उप अभियंता प्रतीक नाईक, विद्युत अभियंता वसंत पुतळे, प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर आदी उपस्थित होते. 

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतंर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या गाळ काढणे कामाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शेतकरी टिप्पर, टॅक्टर आदि विविध वाहनांमधून आपापल्या शेतामध्ये गाळ घेऊन जात आहेत. मागच्या शंभर वर्षात या तलावातील गाळ काढलेला नव्हता, त्यामुळे या तलावामध्ये साठलेला गाळ हा अत्यंत सुपिक असा उच्च प्रतीचा असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी सांगितले.  

  गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गाळ नेल्यास त्यांना 37 हजार 500 अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी  गाळाचे योग्यरित्या मोजमाप झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. हिंगोली शहराचे वैभव असलेल्या जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरु झाले असून, या तलावात येणारे घाण पाणी रोखण्यासाठी नाली बांधकामाचे व पाणी वळविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी नगर परिषदेला दिल्या आहेत. 

तलावात येणारे अशुध्द पाणी रोखल्यामुळे जलेश्वर मंदिर व तलावाचे पावित्र्य जपले जाणार आहे. या तलावाला चांगले पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या तलावात बोटींग, ॲम्पीथिएटर, सेल्फी पॉईंट, ओपन जीम, पार्कींग, फुड प्लाझा आदीची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे हिंगोली शहरातील व परिसरातील नागरिकांची पर्यटनाची सोय होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सांगितले. 

जलेश्वर तलाव सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, रस्ता व विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. तर दुसऱ्या टप्यात बोटींग, ॲम्पीथेटर, सेल्फी पॉईंट, ओपन जीम, पार्कींग, फुड प्लाझा, पाणी शुध्दीकरण यंत्र आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामाची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतली. तसेच तलावात छोटे बेट करुन सुशोभिकरण करण्याच्या सूचना दिल्या. 

यावेळी वरील सर्व कामे करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती नगर अभियंता रत्नाकर अडसिरे यांनी दिली. यावेळी जलसंधारण विभागाचे उप अभियंता प्रफुल्ल खिराडे यांनी जलसंधारण विभागाच्या योजनेंतर्गत आतापर्यंत 2 लाख 50 हजार घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. त्यासाठी रात्रंदिवस 18 पोकलेन व जेसीबी चालू असून जवळपास 100 ट्रॅक्टर व हायवाद्वारे हे काम चालू असून जून अखेर 4 लाख 50 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts

विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबविण्यात यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश, दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे हिंगोली प्रशासनातील अधिकाऱ्यांशी साधला संवाद

Santosh Awchar

नरसी येथे दर्शनासाठी जाणारा ऑटो उलटला; चालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात

Santosh Awchar

जि. प., पं. स. निवडणूक; आरक्षण निश्चितीसाठी 13 जुलै रोजी सभा

Santosh Awchar

Leave a Comment