मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे 1 डिसेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी त्यांनी धीर दिला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करुन त्यांना मदत करण्यासाठीशासन नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार नामदेव ससाने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी महसूल, कृषि विभागाने तातडीने एकत्रिरित्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन 7 डिसेंबरपर्यंत वस्तुनिष्ठ पंचनामे करुन त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एनडीआरएफच्या नियमानुसार शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई देणार आहे, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकाचे एक रुपया भरुन शेतकऱ्यांडून शंभर टक्के विमा नोंदणी 15 डिसेंबर पर्यंत पूर्ण करावेत. यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांना माहिती द्यावी व शंभर टक्के पीक विम्याची नोंदणी होईल याची दक्षता घेण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.
पालकमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातून कोणत्याही प्रकारच्या कर्ज खात्यामध्ये व व्याजामध्ये ही रक्कम वजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच झिरो बॅलन्स अकाउंट मध्ये जमा झालेले पैसे कपात करु नयेत. सातत्याच्या पाऊस व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पावसामुळे एकही शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जून, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान हे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. रास्तभाव दुकानदारांच्या मागण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील वीज पडून मयत झालेल्या राजू जायभाये यांच्या कुटुंबियांना शासनाच्या ज्या ज्या योजनांचा लाभ मिळवून देता येईल त्या त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील मंडळामध्ये नुकसान झालेल्या पिंकाचे व नुकसानीची माहिती दिली. तसेच यलो मोझॅकमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची त्यासाठी लागणाऱ्या अनुदानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
गोजेगाव येथील मयत शेतकऱ्याच्या कुटुंबास दिला चार लाखाचा धनादेश
औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे रविवारच्या मध्यरात्री वीज अंगावर पडून तरुण शेतकरी राजू जायभाये यांच्या घरी जाऊन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची पत्नी दुर्गा राजेंद्र जायभाये यांच्याकडे नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदानाचा चार लाखाचा धनादेश दिला व शासन आपल्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपल्या कुटुंबाला शासनाच्या ज्या ज्या योजनाचा लाभ मिळवून देता येईल त्या त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सांगून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचित केले. तसेच मयत राजू जायभाये यांची पत्नी दुर्गा जायभाये, आई सुशीला जायभाये, अपंग भाऊ जालिंधर जायभाये यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, गोजेगाव सरपंच वर्षा अच्चुतराव नागरे, हिवरा जाटू या गावचे संरपंच लखन शिंदे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.