मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरात माहे मे ते ऑगस्ट 2023 मध्ये घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. यावेळी आरोपींसह एक लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यात होणारी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालून सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांच्या टोळीला पकडण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस विशेष सूचना देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.
यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांचे पथक काम करत होते. हिंगोली शहरात माहे मे ते ऑगस्ट 2023 मध्ये अनेक बंद घरे फोडून घरफोडी झाली होती.
या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तपास पथकाने बारकाईने तपास चक्रे फिरवून अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तपासले अनेक संशयित वस्त्यांवर छापेमारी करून गोपनीय माहिती काढली असता बातमीदाराकडून व सायबर सेलचे तांत्रिक ज्ञान वापरून कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील चोरी, घरफोडी करणारे आरोपी उमेश सर्जेराव चव्हाण याने त्याच्या इतर साथीदारासह मिळून हिंगोली शहरातील अनेक घरफोड्या केलेल्या आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आरोपींच्या घरी जाऊन छापा मारला असता आरोपी उमेश सर्जेराव चव्हाण हा घरी मिळून आला. त्यास विश्वासात घेऊन सदर घरफोडीबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या इतर तीन साथीदारासह हिंगोली शहरातील घरे फोडल्याची कबुली दिली.
यावेळी पोलिसांनी सोन्या- चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून तीन घरपोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, दीपक पाटील, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.