Marmik
क्राईम

घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; कळमनुरीत घरफोड्या केल्याचे निष्पन्न

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत घर फोड्या करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीस हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जेरबंद केले आहे. या प्रकरणातील आरोपीकडून 40 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत दोन लाख 80 हजार रुपये) जप्त करण्यात आले.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयात होणा-या मालाविरुध्दच्या गुन्हयांस प्रतिबंध करून, गुन्हे उघड करण्याबाबत नेहमी सुचना देत असतात तसेच गुन्हयास प्रतिबंध करण्यासाठी वेळोवेळी कोंबींग ऑपरेशन, नाकाबंदी, ऑल आऊट ऑपरेशन राबवीत असतात.

हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, यांना हिंगोली जिल्हयातील मालाविरुध्दच्या गुन्ह्यांना आळा घालुन गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे (स्था.गु.शा., हिंगोली) यांचे पथक काम करीत होते.

दि. १३/०४/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत आरोपीची माहीती घेत असतांना आम्हास गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे श्रीकांत सर्जेराव चव्हाण (रा.धानोरा, ता. कळमनुरी) याने त्याचे इतर साथीदारांसह कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतील सालेगाव, पिंपळदी व कळमनुरी शहरात घरफोड्या केल्या आहेत, अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस पथकाने मौजे धानोरा येथे सदरील आरोपीचे राहते घरी शोध घेतला असता नमूद आरोपी हा त्याचे राहते घरी मिळून आला.

पोलीसांनी आरोपी श्रीकांत सर्जेराव चव्हाण (वय २८ वर्ष, रा. धानोरा, ता. कळमनुरी) यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने व त्याचा साथीदार मित्र धनंजय बापुराव भोसले (रा. ताडपांगरी, ता. जि. परभणी), जनार्धन मनोहर भोसले (रा. कळमनुरी), उमेश सर्जेराव भोसले (रा. कळमनुरी) यांनी मिळून कळमनुरी तालुक्यात घरफोड्या केल्याचे सांगुन हिश्याला आलेला ४० ग्रॅम सोन्याचे दागीने (किंमती २ लाख 80 हजार रुपयांचा) मुद्देमाल काढुन दिला.

सदर आरोपीवर नांदेड जिल्ह्यात घरफोडीचे १० गुन्हे दाखल असुन, लातुर जिल्हयात सुध्दा घरफोड्या केल्याचे प्रथम दर्शनी माहिती मिळाली आहे. तसेच हिंगोली जिल्हयातील यापुर्वीच्या ०४ घरफोड्यामध्ये सदर आरोपी फरार होता. सदर आरोपीकडुन अदयाप पर्यंत ०३ घरफोडीची उकल झाली असुन, अजुन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर आरोपीस कळमनुरी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी हजर केले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार, पांडुरंग राठोड, राजु ठाकुर, नितिन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर , प्रशांत वाघमारे, रविना घुमनर स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.

Related posts

बाळापुर येथील जुगार अड्ड्यावर छापा; एक लाख 16 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त, नऊ जणांविरुद्ध गुन्हा

Santosh Awchar

ट्रॅक्टर चोरीची फिर्याद देणाराच निघाला 420! कर्ज बुडविण्यासाठी रचला कट

Santosh Awchar

हिंगोली पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; तडीपरीचे आदेश झुगारून वावरणाऱ्या दोघांना पकडले

Santosh Awchar

Leave a Comment