मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणारी आंतर जिल्हा टोळी पकडून जेरबंद केली आहे. यावेळी पथकाने 5 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे चोरीच्या म्हशी खरेदी – विक्री गैर व्यवहारात पूर्णा येथील एका पक्षाचा नगरसेवक, प्रतिष्ठित पिता- पुत्रांचा समावेश आहे. सदरील व्यक्ती ही हे संपूर्ण रॅकेट चालवत होते असे पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात मालाविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिलेले आहेत.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे कळमनुरी शिवारात नंदकुमार सोनटक्के यांच्या शेतातून दोन जाफरा व मुरा जातीच्या काळ्या रंगाच्या म्हशी पिकअप वाहनातून चोरी करणारे इसम नामे अल्ताफ खान गफार खान पठाण (वय 19 वर्ष), वसीम अक्रम शेख हबीब (वय 23 वर्ष दोन्ही रा. इंदिरानगर कळमनुरी), अजीम खान करीम खान पठाण (वय 20 वर्ष, रा. खाजा कॉलनी कळमनुरी) यांना ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदरील म्हशी ह्या इसमनामे उरूज खान युसुफ खान (रा. खाजा कॉलनी कळमनुरी) याच्यासह त्याच्या मोटारसायकल चोरी करण्यासाठी रेखी करण्यासाठी वापरून म्हशी चोरी करून टाटा एस चार चाकी पिकअपने पूर्णा येथे नेऊन चोरीच्या म्हशी खरेदी विक्री करणारे इसम इमरान कुरेशी मकदूम कुरेशी, मकदूम कुरेशी मो. इस्माईल कुरेशी (दोन्ही रा. कुरेशी मोहल्ला पूर्णा जिल्हा परभणी) यांना विकल्याचे सांगितले.
चोरीच्या म्हशी विकून मिळालेले पैसे व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 5 लाख 45 हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी नामे अल्ताफ खान गफार खान पठाण, वसीम अक्रम शेख हबीब, अजीम खान जरीब खान पठाण यांना पुढील कार्यवाहीसाठी कळमनुरी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
पूर्णा येथील चोरीच्या म्हशीचा व्यापार करणारे पिता-पुत्र नामे इमरान कुरेशी मकदूम कुरेशी व मकदूम कुरेशी मोट इस्माईल कुरेशी हे तसेच रेखी करणारा इसम पुरुष खान युसुफ खान हे तिघे फरार आहेत.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांबर घेवारे. पोलीस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली.