मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्य गांजा तस्करीचे रॉकेट उध्वस्त केले आहे. यावेळी पथकाने 89 किलो 198 ग्रॅम (किंमत 17 लाख 83 हजार 960 रुपये) जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध धंद्याविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजा लागवड तसेच विक्री विरुद्ध प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिल्या होत्या या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक रात्रगस्तीवर होते.
11 जानेवारी रोजी रात्रगस्त वसमत शहर व ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत करत असताना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे खुदनापुर शिवारात विहिरीजवळ नागोराव विश्वनाथ चव्हाण याचे शेतामध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठवणुक केली आहे व सदरचा गांजा हा परराज्यातुन खरेदी करून आणला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने छापा कार्यवाहीकामी लागणारे सर्व साहित्यासह तात्काळ रवाना होवुन मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला. यावेळी तेथे खाकी रंगाचे चिकट टेपने चिपकवलेले तब्बल ४० पुठ्याचे बॉक्स मिळून आले.
सदर बॉक्समध्ये गांजाच्या झाडाचा बारीक केलेला वाळलेला पाला – पाचोळा हिरव्या रंगाचा उग्रट वास येत असलेला एकुण ८९ किलो १९८ ग्रॅम वजनाचा एकुण १७ लाख ८३ हजार ९६० रूपये किंमतीचा गांजाचा माल मिळाल्यामुळे तो जप्त करण्यात आला.
सदरचा गांजा परराज्यातुन खरेदी करून आणुन स्वतःच्या शेतामध्ये साठवणुक करणारा आरोपी नामे आदिनाथ नागोराव चव्हाण (रा. खुदनापुर ता. वसमत, जि. हिंगोली) याच्या विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. ०५/२०२४ कलम ८ (क), २०(ब)ii एन.डी.पी.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे. तसेच सदर छापा कार्यवाहीसाठी पो.स्टे. वसमत शहरचे पोलीस उपनिरीक्षक महिपाळे, सपोउपनि शेख हकीम, मपोशि/मगर यांनी मदत केली आहे.