मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – नांदेड येथील गंभीर गुन्ह्यातील तडीपार आरोपी व त्याचे साथीदार दरोड्याच्या तयारीत असताना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून गावठी पिस्तल व खंजिरासह पाच लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हिंगोली येथील डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मालाविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे तसेच बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले आहेत.
यावरून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठूबोने यांच्या पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 22 जुलै रोजी काही इसम हे रेल्वे स्टेशन परिसरातील मोकळ्या जागेत अंधारात दबा धरून एखादा गंभीर मालाविरुद्धचे गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे थांबलेले आहेत व त्यांच्या बाजूला एक स्विफ्ट डिझायनर चार चाकी वाहन एमएच ४७ वाय ४१३० गाडी उभी आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरील ठिकाणी तात्काळ पोहोचवून रेल्वे स्टेशनच्या बाजूला मालगाडी रॅक जवळ मिळून आलेली स्विफ्ट डिझायनर वरील क्रमांकाची कार ताब्यात घेतली. हनुमान मंदिराजवळ सरस्वती नगर हिंगोली येथे ओलसावलीत मोकळ्या जागेत काही इसम लपलेले दिसले.
नमूद इसमांची हालचाली ह्या संशयास्पद वाटल्याने त्यांना पकडण्यासाठी जात असताना तेथे असलेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. इतर चार व्यक्तींना जागीच ताब्यात घेतले.
त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी नागेश भुजंगराव गोरे (वय 21 वर्षे रा. शाहूनगर हडको नांदेड), वासुदेव मारुती चौंडेकर (वय 23 वर्ष रा. बस स्टॉप जवळ हडको नांदेड), बुद्धभूषण भगवान खिल्लारे (वय 19 वर्षे रा. शाहूनगर हिंगोली), संदीप अंबादास कुहिरे (वय 24 वर्ष रा. जिल्हा परिषद वसाहत हिंगोली) असे सांगितले.
इतर इसमाकडून एक लोखंडी गावठी पिस्टल, अजिंह 6 एम एम चे 4 राऊंड, दोन खंजीर, एक लोखंडी गोलाकार rod / गज, एका प्लास्टिक बंदी मध्ये मिरची पावडर, एक दोरी अंदाजे दहा फूटलांब, असा एकूण 5 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरील साहित्य ताब्यातील व्यक्तींचे जवळ गाडीमध्ये मिळून आल्याने पोलिसांना खात्री झाली की सदर व्यक्ती हे दरोडा घालण्याच्या पूर्वतयारीने एकत्र आले असून त्यांना वेळीच ताब्यात घेतले नसते तर एखादा गंभीर दरोड्यासारखा गुन्हा घडला असता.
वरील आरोपींविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादविसह सह कलम 3 / 25, 4 / 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, प्रेम चव्हाण, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली.