मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी उद्या 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जलजीवन विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आदेशित करण्यात आले आहे. सदरील आदेशानुसार 26 जानेवारी रोजी जिल्हाभरातील ग्रामपंचायत मध्ये जलजीवन विशेष ग्रामसभा घेतली जाणार आहे.
केंद्र शासनाकडून 2024 पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास शुद्ध व विनायोग्य पाणी मिळण्या च्या उद्देशाने जलजीवन अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियाना अंतर्गत ‘हर घर जल’ हा उपक्रम राबविला जात आहे.
या उपक्रमास लोकसहभाग व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी विविध स्तरावर व्यापक प्रचार प्रसिद्धी व माहिती देण्याचे काम केले जात असून या अनुषंगाने 26 जानेवारी भारताच्या प्रजासत्ताक दिन जलजीवन विशेष ग्रामसभा आयोजित करून या सभेत जलजीवन मिशन संदर्भात माहिती दिली जाणार आहे.
ग्रामसभेदरम्यान ग्रामसभा सदस्यांसोबत ग्राम आरोग्य शोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांनाही आमंत्रित करून विशेष स्थान दिले जाणार आहे. यावेळी उपस्थित समिती सदस्यांना ओळख तसेच त्यांचे अधिकार व जबाबदारी बाबत उपस्थित ग्रामस्थांना माहिती सांगितली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या जनशक्ती मंत्रालयाने सन 2019 पासून जलजीवन मिशन सुरू केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरूनही काम केले जात आहे. सदर अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे प्रतिव्यक्ती 55 लिटर पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने हे अभियान राबविले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातही सदरील अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. या ‘हर घर जल’ उत्सव मोहिमेत जिल्ह्यातील सर्व गावांनी सहभाग नोंदवून जिल्ह्यात ‘हर घर जल’ हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख सनियंत्रणाखाली जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत मध्ये जलजीवन मिशन अंमलबजावणीसाठी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 26 जानेवारी रोजी ग्रामसभा आयोजित करून गावात 100% नळ जोडणी, गावातील नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देणे शालेय विद्यार्थ्यांद्वारे रॅली काढून या योजनेची जनजागृती करण्यात यावी, गावातील पाण्याच्या स्त्रोतांची एफटीके कीट द्वारे तपासणी करून गावातच जल उपलब्ध करून देणे, हर घर जल उत्सव अभियानात ग्रामपंचायतीने सहभागी होणे, अशा विविध सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच ग्रामस्थळावरील सर्व विकास योजनांची माहितीही दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी 26 जानेवारी रोजी आयोजित ग्रामसभेत जलजीवन मिशनच्या अनुषंगाने पाणी व स्वच्छता या प्रमुख घटकावर भर देऊन ग्रामस्थात जनजागृती घडवून आणावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.