मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – तालुक्यातील जांब तर्फे सिंदगी येथून रिकाम्या जागेत अवैधरित्या साठवून ठेवलेले सागवान हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार व त्यांच्या पथकाने जप्त करून एका विरुद्ध कार्यवाही केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.
हिंगोली येथील कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली 10 फेब्रुवारी रोजी सिंदगी नियत क्षेत्र अंतर्गत गस्त करत असताना त्यांना जांब तर्फे सिंदगी येथील शिवाजी मारोतराव टार्फे यांच्या रिकाम्या जागेत अवैध साठवून ठेवलेले सागवान नग दिसून आले.
सदर सागवान नगावर वन विभागाचे कुठल्याही प्रकारचे स्वामित्व चिन्ह दिसून आले नाही. त्यामुळे प्रथम गुन्हा नोंद करून पंचनामा नोंदवण्यात आला. सागवान मालाचे मोजमाप घेण्यात आले. तसेच त्याची वेगळ्याने यादी बनवण्यात आली.
यावेळी 88 सागवान नग (ज्याचे परिमाण 2.138 घनमीटर आहे) एवढा माल जप्त करून जप्ती संतक उमटवून जप्ती नामा बनवण्यात आला. तसेच रीतसर कार्यवाही करण्यात आली. याप्रकरणी शिवाजी मारोतराव तर्फे याच्यावर कार्यवाही करण्यात आली.
ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक स्वप्निल शिरसागर यांनी केली.