हिंगोली : संतोष अवचार
सध्या हिंगोली जिल्ह्यात पावसास सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यामधील सर्व हॉटेल व्यवसायिक, मिठाई भांडार, चाट भांडार, पाणी पुरी तसेच भेल विक्रेते या व्यवसायिकांची सखोल तपासणी करुन तपासणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या व्यवसायीकाविरूद्ध कडक कारवाही करण्याविषयी जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित केले आहे.
या आदेशाच्या अनुषंगाने वरील अन्न व्यवसायिकांचे प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्याकडून सखोल तपासणी होऊन, तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या व्यवसायिकांविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल. तसेच विनापरवाना, विना नोंदणी व्यवसाय करणाऱ्या आस्थापना विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल.त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामधील सर्व हॉटेल व्यवसायिक, मिठाई भांडार, चाट भांडार, पाणी पुरी तसेच भेल विक्रेते अन्न व्यवसायिकांनी अन्न आस्थापना स्वच्छ व नीट नेटकी ठेवावी. तसेच तयार अन्न पदार्थ नीट झाकून ठेऊन व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, हिंगोली कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.