मीरा गणगे (कदम) –
आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आपल्याला मोबाईल हा शरीराच्या एखाद्या अवयवाएवढाच महत्त्वाचा वाटतो. आपल्या घरातील आई वडील मोबाईल वापरताना पाहून लहान मुले सुद्धा या मोबाईल कडे आकर्षित झाली आणि बघता बघता या मोबाईल मध्ये त्यांचे बालपण हरवले की काय असा प्रश्न निर्माण झाला.
अगदी लहान मुले म्हणजे अगदी सहा महिन्याचे मूल सुद्धा मोबाईल कडे आकर्षित होत आहे. मोबाईल मधील रंगीबिरंगी चलचित्रे मोबाईलचा प्रकाश, मोबाईलचा आवाज यामुळे लहान मुलांना मोबाईलचे आकर्षण वाटते. मोबाईल मधील कार्टून्स, गेम्स मुलांना आकर्षित करतात.
सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पालकच अगदी लहान वयात मुलांना एखाद्या खेळण्यासारखा मोबाईल हातात देतात आणि त्याची सवय लावतात.
एखादे मूल रडत असेल तर पालक लगेच त्याच्यासमोर मोबाईल देतात. मुल रडण्याचे थांबते त्यामुळे पुढे प्रत्येक वेळी मोबाईल देण्याची ही चूक पालकांकडून होते. मुले जेवत नसतील तर पालक मुलांसमोर मोबाईल धरतात आणि त्यांना जेवू घालतात. पुढे प्रत्येक वेळी मुलांना ही सवय लागते. कधीकधी मुलांच्या अभ्यासासाठी पालक मुलांना मोबाईल देतात कधी मुलांच्या हट्टासाठी मुलांना मोबाईल दिला जातो.
कारणे काही का असेना पण घरातील पालकांकडूनच मुलांना मोबाईलची सवय लावली जाते हे निश्चित. नंतर मात्र मुलांना मोबाईलचे व्यसन लागते आणि ही बाब पालकांसाठीच चिंतेची बनते. कारण या मोबाईल मुळे मुलांचे मानसिक, शारीरिक आणि भावनिक विश्व धोक्यात आले आहे. मुलांचे बालपण या मोबाईल मध्ये हरवत आहे आणि मुले मोबाईलच्या पूर्णपणे आहारी जात आहेत. जणू काही त्यांना मोबाईलचे व्यसनच जडले आहे.
मोबाईल फोन वापरण्याचे अनेक दुष्परिणाम मुलांमध्ये दिसत आहेत. मोबाईल मधून निघणाऱ्या रेडिएशन या मुलांसाठी खूप हानिकारक असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर घातक परिणाम होत आहेत. मोबाईल मुळे खाण्यापिण्याकडे मुलांची लक्ष राहत नाही रात्री मोबाईलवर उशिरापर्यंत जागल्यामुळे त्यांची झोप शांत होत नाही.
मोबाईल मधील विविध व्हिडिओज आणि पोस्ट पाहून मुलांच्या भावनिक विकासात अडथळे निर्माण होत आहे. त्यांची चिडचिड वाढली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना लवकर राग येत आहे. आई-वडिलांबद्दल मराठी वडीलधाऱ्या मंडळींबद्दल त्यांच्या मनातील आदर नाहीसा होत आहे. त्याचे कारण म्हणजे घरच्यांसोबत मुलांचा संवाद अतिशय कमी झाला आहे. मुलांमध्ये लठ्ठपणा, उपोषण, वजन कमी होणे, अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यांची वैचारिक पातळी कमी होताना दिसत आहे. मोबाईल मधील काही विशिष्ट गेम्स मुलांसाठी प्राणघातक होत आहेत.
मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणे ही पालकांसाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्या विशेष प्रयत्नाने मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यात यश मिळू शकतो. मोबाईल फोन वापरणे हे पूर्णतः चुकीचे नाही किंवा सर्वच त्याचे दुष्परिणाम आहेत असेही नाही. पण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो. मोबाईल हे दुधारी शस्त्र सारखे आहे त्याचे चांगले वाईट असे दोन्ही परिणाम आहेत. त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा याची माहिती पालकांनी मुलांना देणे महत्त्वाचे आहे.
जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO यांचे असे म्हणणे आहे की, सध्या तरी मुलांना पूर्णपणे मोबाईल पासून दूर ठेवणे कठीण आहे. पण मोबाईलचा अतिरेक मात्र आपण टाळू शकतो. यासाठी पालकांनी मुलांची संवाद साधायला हवा, त्यांना वेळ द्यायला हवा.
मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आपण निश्चितच काही गोष्टी करू शकतो. यासाठी आपल्या घरातील वातावरण मैत्रीपूर्ण असायला हवे. रात्रीचे जेवण एकत्र करताना मुलांशी मोबाईल पासून होणाऱ्या दुष्परिणामांची चर्चा करता येईल.
मनोरंजनासाठी मुलांना मोबाईल न देता त्यांना मैदानावर खेळण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. मोबाईलचा वापर करून ज्या मुलांनी आपला शैक्षणिक विकास केलेला आहे त्यांची उदाहरणे मुलांना सांगता येतील. कोण कोणत्या चांगल्या कारणांसाठी आपण मोबाईलचा वापर करू शकतो हे मुलांना समजावून सांगता येईल.
घर, शाळा या ठिकाणी मुलांच्या कृतीशीलतेला वाव दिल्यानंतर मुले आपोआपच मोबाईल पासून दूर राहतील. रात्री आपली मुले मोबाईलवर राहणार नाहीत यासाठी मुलांना योग्य वेळी झोपण्याची आणि योग्य वेळी उठण्याची सवय पालकांनी लावणे आवश्यक आहे.
इंटरनेट वरील काही गोष्टी पाहताना मोबाईलपेक्षा स्मार्ट टीव्हीवर पाहण्याची सवय मुलांना लावता येईल.
मोबाईल फोन हे खरोखरच एक शक्तिशाली डीव्हायस आहे. त्याचा वापर संयमाने आणि काळजीपूर्वक केल्यास मुलांचे जे हरवत चाललेले बालपण आहे ते बालपण आपल्याला नक्कीच फुलवता येईल.
मीरा गणगे (कदम)
प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंतुले नगर, हिंगोली.