Marmik
Hingoli live लाइफ स्टाइल

लोकसभा निवडणूक : लोकशाहीच्या लग्नाला यायचं हं…! 

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – भारतीय संविधानाने वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या युवतीला आणि २१ वर्षे पूर्ण करणा-या युवकाला सज्ञान म्हणून घोषित केले आहे. आता ही सज्ञान झालेली मंडळी त्यांच्या किंवा पालकांच्या इच्छेनुरुप जोडीदाराशी विवाह करण्यासाठी बोहल्यावर चढण्यास तयार होतात. त्यासाठी सुरुवात होते ती, त्यांच्या लग्नपत्रिकेपासून…अशीच एक लग्नपत्रिका सध्या व्हायरल होते आहे… ती एका आगळ्यावेगळ्या विवाहाची….!  तिच्या लग्नाची तारिखही ठरली आहे आणि वऱ्हाडीही…! अगदी स्थळ आणि वेळही…!

सध्याचे दिवसही लगीनसराईचे असल्यामुळे मुंडावळ्या बांधून बसणा-यांना हा दिवस हवाहवासा वाटतो. आतापर्यंत अबालवृद्धांनी कित्येक विवाहाप्रसंगी उपस्थित‌ी दर्शविली असेल. तर थोरा-मोठ्यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिलेही असतील. मंगल कार्य म्हटले की, आपल्या देशात तितक्याच उत्साहाने, हौस-मौजेने शेजारी-पाजारी, नातेवाईक, जातीधर्मापलीकडे मित्र, वधु-वराकडील मंडळींना सहभागी करून घेतले जाते.

या प्रसंगी रुसवे-फुगवे विसरून सर्वजण सहभागी होत असतात. कारण दोन जीवांच्या रेशीम गाठी कायमच्या बांधल्या जातात त्या इथेच! म्हणून आपण सज्ञानी युवक -युवतीही सहभागी होत असतो. त्या मंगलप्रसंगी प्रत्येक गोष्ट तितक्याच काळजीपूर्वक तपासून घेतली जाते. अगदी आहेराच्या कपड्यांपासून सर्वच बाबी तपासल्या जातात. लग्नपत्रिकांचेही तसेच असते.

 विविध रंगाच्या, ढंगाच्या, तसेच कुलस्वामिनीला, कुलदेवतेला, महापुरुषांना वंदन, नमन केलेल्या…! गणराया, गजाननाला, देवी अहिल्येला, राणी लक्ष्मीबाईला, छत्रपती शिवरायांना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, फुले दाम्पत्याला, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांपासून ते अनेक समाजसुधारकांना या लग्नपत्रिकेवर पहिला मान असतो.. आता यंदाचे वर्षही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय लोकशाहीच्या विवाहाचे आहे. तिच्या वैवाहिक जीवनासाठीचे आहे.   

II मी प्रथमत: व अंतिमत: भारतीय II

आग्रहाचे निमंत्रण असून, भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव चि. मतदार आणि भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या चि. सौ. का. लोकशाही या दोघांचा शुभ विवाह चैत्र कृ. २ शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ वाजून सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा तब्बल १० तासाच्या प्रदीर्घ वेळेत हा विवाहप्रसंग सुरु राहणार आहे.

हा वेळ लोकसभा -२०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरुपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी हेची निमंत्रण अगत्याचे…! आपले एक मत, भारताची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी…! 

आपले विनित आम्ही भारताचे लोक वरील विनंतीला मान देऊन मतदान करायला यायचं हं… आमच्याशिवाय तर मज्जाच नाही… – कु. निळीशाई चि. ईव्हीएम

स्थळ : आपले जवळचे मतदान केंद्र  

टीप : – ‘आपले मतदान हाच आमचा आहेर आणि विकसित भारत हेच आपले रिटर्न गिफ्ट’ अशा प्रकारची ही विवाहाची पत्रिका असून, या लोकशाहीच्या विवाहासाठी १५-हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व १८ वर्षावरील सर्वांनी या विवाहास आपली हजेरी लावून लोकशाहीच्या या पवित्र महोत्सवास सहभागी होण्याचे आवाहन आयोजन भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

Related posts

कुरुंदा येथे हळदी – कुंकाचा कार्यक्रम

Gajanan Jogdand

सतत गुन्हे करणारी टोळी पोलीस अधीक्षकांच्या हिटलिस्टवर ! पुसेगाव येथील दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

सकल मातंग समाजाचे भर पावसात सेनगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन; प्रलंबित मागण्या मान्य करण्याची मागणी

Gajanan Jogdand

Leave a Comment