मार्मिक महाराष्ट्र न्यूज / नेटवर्क :-
हिंगोली – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना निष्ठावान शिवसैनिकांना डावलल्याने या शिवसेनेचा नाराजीचा सूर उमटत आहे.
1 सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे निष्ठावान शिवसैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे यांच्यासह हिंगोली जिल्ह्यातील निष्ठावान शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना पक्ष वाढीसाठी यातील बहुतांश निष्ठावान शिवसैनिकांनी 1985, 1990, 1995 पासून आपले योगदान देऊन रात्रंदिवस कार्य केलेले आहे. असे असताना दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या पदाधिकारी निवडीत बहुतांश निष्ठावान शिवसैनिकांना डावलण्यात आले आहे.
पक्ष बदलून आलेल्यांना तात्काळ महत्वाची पदे देण्यात आली. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेना वाढीसाठी व पक्ष बळकटीसाठी काम करणाऱ्या निष्ठावान शिवसैनिकात मोठी नाराजी दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यात पक्षप्रमुखांनी आणखी एक जिल्हाप्रमुख द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी निष्ठावान शिवसैनिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.