मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील जनावरे मोठ्या प्रमाणात लंपी स्कीन या आजाराने ग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील पाचही तालुक्यात जनावरांतील हा संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात पसरला असल्याने 14 सप्टेंबर रोजी होणारा सार्वजनिक बैल पोळा हा सण रद्द करण्यात आलेला आहे.
घरगुती बैलपोळा साजरा करण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गोरक्षनाथ संस्थान वाई यांनी देखील 14 व 15 सप्टेंबर रोजी आयोजित केलेला दोन दिवशीय महापोळा रद्द केला आहे. तसे पत्रही संस्थांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बैलपोळा मोठ्या उत्साहात व सार्वत्रिकरित्या साजरा करण्यात येणार होता. परंतु जिल्ह्यातील गुरांवर विशेषता गोवंशीय पशुधनावर मोठ्या प्रमाणात लंपी स्किन या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे.
या अनुषंगाने हिंगोली जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मोठ्या प्रमाणात जनावरे एकत्र आणून पोळा साजरा करण्यावर प्रतिबंध घातले. याबाबतचे परिपत्रक देखील जारी करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने वाई गोरक्षनाथ येथील गावकऱ्यांनी एकमताने ठराव घेऊन वाई गोरक्षनाथ येथील महापोळा रद्द झाल्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. तसेच सदरचे पत्र कुरुंदा पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच कोणीही आपली गोवंश किंवा इतर जनावरे एकत्रित आणू नये जेणेकरून लंबी स्कीन या रोगावर नियंत्रण करणे सोपे होईल.
तसेच वाई गोरक्षनाथ येथील महापोळा रद्द झाल्याने वाई गोरक्षनाथ येथेही कोणीही गोवंश किंवा इतर जनावरे आणू नयेत, असे आवाहन पोलीस प्रशासन व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.