मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. शेतकऱ्यांची बोगस बियाण्यातून फसवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथकांमार्फत कृषि निविष्ठा केंद्रांवर लक्ष ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) समाधान घुटुकडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून हळद, ऊस व तूर आदी उत्पादनावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग सुरु करावेत. तसेच जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या विविध योजना राबवाव्यात आणि रेशीम, मध संशोधन उद्योगाला चालना देण्यासाठी कृषि, रेशीम विभागाने विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाकडे शेतकऱ्यांचा कल अधिक होता. यावर्षी शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे. यासाठी त्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे, बियाणे खरेदीची पावती, पिशवी आदी सांभाळून ठेवण्याचे सांगावे.
तसेच विक्रेत्यांची नावे आणि पत्ते जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावेत. कोणत्याही परिस्थितीत बोगस बियाणे विक्री होऊ नये, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करावी. यासोबतच रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पिकांवर शेतकऱ्यांची अवलंबितता अधिक आहे.
या शेतकऱ्यांवर अरिष्ट ओढविल्यास त्यांची परिस्थिती बिकट होते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर आणि त्यांची उत्पादकता वाढणारी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.
जिल्ह्यात पावसाचे आगमन उशीरा होणे, पावसाचे निर्गमन लवकर होणे तसेच पावसाचे आगमन व निर्गमन वेळेवर परंतु पिक कालावधीध्ये दीर्घ कालावधीचा खंड पडणे, संततधार व अतिवृष्टी होणे अशा अनिश्चित पावसासाठी पर्यायी आपत्कालीन परिस्थितीत कोणती पिके घ्यावीत व कोणती घेऊ नयेत याचे नियोजन करावे. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान ईकेवासी नसल्याने प्रलंबित आहेत. त्यामुळे ईकेवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात यावे.
यासोबतच अपघात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कृषि निविष्ठा गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती करताना चांगले वाण आणि कमी पाण्यात चांगली उत्पादकता देणारी, तसेच शेतीमधील नवीन बाबींची माहिती देण्यात यावी.
नवीन संशोधनाची माहिती देऊन शेती संरक्षित करणे गरजेचे आहे. शेती सुकररित्या करण्यासाठी यांत्रिकीकरण आणि इतर योजनांचा लाभ देण्यात यावा. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यासोबतच त्यांचा शेतकरी उत्पादक कंपनीशी समन्वय साधून द्यावा.पिक विम्यामुळे शेतकऱ्यांना आपदग्रस्तावेळी मदत मिळण्यास मदत होते. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.
लवकरच दुसऱ्या टप्याचे काम सुरु होणार आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी पिक कर्ज महत्वाचे आहे. यावर्षी सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. बँकांनी कर्ज प्रक्रिया करण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करावी. शेतकऱ्यांना मदतीसाठी नवीन वाणांची पिके देण्यात यावी. हळद, ओवा सारखी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे.
तसेच फळ पिके, बांबू लागवड आणि वैरण विकासाची कामे करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना ज्या योजनांमधून लाभ मिळणार आहे, अशा योजनांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी केले.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पर्जन्यमान माहिती, पीकनिहाय क्षेत्र उत्पादन, पिक विविधीकरण, आपत्कालीन पीक नियोजन, नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी ईकेवायसी प्रलंबितबाबतची सद्यस्थिती, खरीप हंगामासाठी बियाणे मागणी,
पुरवठा व विक्री बाबतचा अहवाल, कृषि निविष्ठा गुणवत्ता नियंत्रण अहवाल, रासायनिक खताच्या संरक्षित साठ्याचे उद्दिष्ट आणि नियोजन, मंजूर आवंटन, सोयाबीन ग्रामबिजोत्पादनाचा इष्टांक, विशिष्ट वाणांची मागणी असलेल्या वाणनिहाय कापूस बियाणांची मागणी, भरारी पथकाची स्थापना, मृद आरोग्य व सुपिकता तपासणी कार्यक्रम, प्रधानमंत्री पिक विमा योजना,
फळ पिकविमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, आत्मा अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत योजना, फळबाग लागवड योजना, महावितरण मार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या वीज जोडणी, पीक कर्ज वाटप, रेशीम शेती नियोजन, मधोत्पादन यासह विविध योजनांची सविस्तर माहिती सादरीकरणारे दिली.
यावेळी कृषि विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया मोहिम या विषयावर तयार करण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे तसेच गोगलगाय प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकेचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.