माझी अंगणवाडी – भाग 2
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
औंढा नागनाथ – तालुक्यातील अंगणवाड्यांची परिस्थिती काळजी करण्यासारखी असून पाच पर्यवेक्षक अंगणवाड्यांच्या देखरेखीसाठी नेमलेले आहेत. या पर्यवेक्षकांकडे प्रत्येकी 30 ते 35 गावे दिलेली आहेत. त्यामुळे या पर्यवेक्षकांचे या अंगणवाड्यांवर कसे नियंत्रण असेल याबाबतची कल्पना वाचकांना यावी.
औंढा नागनाथ तालुक्यात आदिवासी व दुर्गम भाग आहे. तालुक्यातील बालकांचे कुपोषण होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशानुसार जिल्हा यंत्रणेकडून अंगणवाड्यांमार्फत पोषण आहार पुरविला जातो. मात्र हा पोषण आहार कितपत या आदिवासी व दुर्गम भागात पोहोचतो हा काळजी करण्याचा विषय आहे. तालुक्यातील अंगणवाड्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी पाच पर्यवेक्षकांची नेमणूक केलेली असून यातील प्रत्येक पर्यवेक्षकाकडे 30 ते 35 गावे सोपविण्यात आलेली आहेत. हे सर्व पर्यवेक्षक आपला कारभार तालुक्याच्या ठिकाणावरून चालवतात.
एखाद्या वेळेस अधिकारी व कोणी लोकप्रतिनिधी भेट देतील त्याचवेळी हे अधिकारी संबंधित अंगणवाड्यांवर हजर होतात अन्यथा ते या अंगणवाड्यांकडे ढुंकूनही पहात नाहीत, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक पर्यवेक्षकाकडे 30 ते 35 अंगणवाड्या सुतविण्यात आल्याने शासनाकडून बालकांना पोषण आहार यात केळी, अंडी इत्यादी कशी पोहोचत असतील तसेच काही अंगणवाड्यांमध्ये मिळाले तरी या अंगणवाड्यातून मुलांना ते वितरित कशा पद्धतीने होत असतील याबाबत वाचकांनी कल्पना करावी.
अंगणवाड्यांवर देखरेखी साठी नेमण्यात आलेले पर्यवेक्षक बेफिकीर राहत असून अनेक ठिकाणच्या अंगणवाड्यांना इमारती नाहीत तर कुठे शौचालय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्व काही अलबेल असून जिल्हा प्रशासनावरील अधिकाऱ्यांनी या सर्वांकडे लक्ष देऊन या सर्व प्रकरणाची चौकशी करावी व पोषण आहार संदर्भातील पालकांच्या येणाऱ्या तक्रारी सोडवाव्यात. तसेच संबंधित अंगणवाडी केंद्रावरील व पर्यवेक्षकांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.