Marmik
दर्पण

विवाह संस्कृती कोणत्या दिशेने?..!

दर्पण – विशाल वसंतराव मुळे – आजेगावकर

लग्न समारंभात फोटो ग्राफर मंडळींनी संस्कृती पेक्षा ‘त्या’ फोटोलाच जास्त किमंत दिली आहे. सहा ते आठ तास त्यात जातात. लग्न त्यामुळे अडीच ते तीन तास उशिरा लागतात, ह्यावरही कुणाचं लक्ष नाही. त्यात मंडपवाल्याप्रमाणे आता त्यांचे देखील ‘पॅकेज’ प्रचंड वाढलेली आहेत. एका ‘पॅकेज’च नाव ऐकूण तर मी गोंधळून गेलो ते नाव आहे “केंडीडेट फोटो” म्हणजे नवरी नवरदेव ह्यांचे स्पेशल फोटो काढण्याचं एक नवीन ‘पॅकेज’.

ययोरेव समंकुलम् ययोरेव समंशिलम्|

तयोर विवाह मैत्रीचं उत्तमाधमो क्वचित||

श्रीमद्भागवतात श्रीकृष्ण आणि रुख्मिणी ह्यांचा संवाद चालू होता. रुख्मिनी मातेला थोडा अभिमान झाला, आणि तो देवाच्या लक्षात आला. “तिळमात्र जरी होय अभिमान| मेरू तो समान भार देवा|| असं आल्यामुळं श्रीकृष्ण आपल्या विनोदी शैलीत म्हणाले, रुख्मिणी.! मी चोर, नेहमीच चोऱ्या करायचो, गायी ओळायचो, माझं बालपण जवळ जवळ शेतात गेलं, तरीही तू मला वरल. तू राजाची मुलगी. नेहमीच राजप्रासादात वाढलेली. आजूबाजूला तुझ्या सर्व सुख सोयी आणि तू माझं वरण करावस? आश्चर्य आहे. तेंव्हा हा वरील श्लोक महाभारतात आला. त्याचा अर्थ असा आहे. ज्यांच रूप, गुण, शिल, कुल, समान आहे, विवाह आणि मैत्री ही शक्यतो त्यांच्यातच होते. क्वचितच ह्या व्यतिरिक्त झालेली आढळते. श्रीकृष्ण सुदामा देखील मैत्रीचं त्यातलच उदाहरण आहे. पण आपला आजचा विषय विवाह आहे आणि आपली भारतीय विवाह संस्कृती ही आदर्श वस्तुपाठ अशी संस्कृती आहे. भारतीय संस्कृती जशी अनादी अनंत आहे, तशीच आपली विवाह संस्कृती देखील आनंदी अनादी अनंत आहे. मात्र आताच्या ह्या झगगाटामध्ये ह्या संस्कृतीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे, आणि सध्याची स्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे…

मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे, हल्ली तो ‘रेशो’ वाढत आहे. पण मुलींच्या पेक्षा मुलींच्या आई – वडीलांच्या अपेक्षा जास्त वाढत आहेत. असाच सार्वत्रिक अनुभव येतो. अनावश्यक गरजा आणि त्या गरजेला पुरणाऱ्या पैशासाठी शेती विकणे आणि मग लग्न लावणे अशी स्थिती झाली आहे. मुलींच्या अपेक्षित असलेली विषय ग्राह्य म्हणून पुढे जाऊ पण, मुलीपेक्षा ही अपेक्षा तिच्या आई – वडील ह्यांनाच जास्त असते. एक अपेक्षा अशीही असते म्हणजे मुलांकडे शेत तर पाहिजे, पण मुलगी शेतात जाणार नाही. मग शेत कशाला पाहिजे हे काही माझा लक्षात आलेलं नाही.

असो. दुसरा विषय असा आहे की आम्ही अजूनही जाती पोट-जातीत अडकून पडलो आहे. सावरकरादी समाजसुधारक मंडळी सांगून थकली आहे की, विवाह आंतरजातीय व्हावेत, छोटे व्हावेत आणि संस्कृतीप्रचुर व्हावेत. पण ह्यापेकी आपण सध्या काहीही करत नाही. जे की करणे अत्यंत गरजेचं आहे. भारतीय संस्कृती प्रगल्भ आहे ह्या संस्कृतीला चार आश्रम व्यवस्था आहे ब्रम्हचर्य, गृहस्थ, संन्यस्थ आणि वानप्रस्थ. ह्यात सर्वात श्रेष्ठ गृहस्थ सांगितलेला आहे. आणि गृहस्थ ह्या विषयासाठी विवाह हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. विवाह हा विषयच जर अडचणींचा होत असेल तर हा आश्रम जो की बाकीच्या सर्व आश्रमाचा आधार आहे त्यांचं काय होणार हा चिंतनाचा प्रश्न आहे…

लग्न जुळत नाहीत ही अडचण महत्वाची म्हणावी की लग्नात होणारा प्रचंड खर्च, नको तो शान – शौख, पैशाची उधळण, हिडीस वृत्तीचा विषय, वाढलेला आणि त्या ‘फ्री विंडींग’ माध्यमातून चालणारा हैदोस, फोटोग्राफ मंडळींची अरेरावी, हळद हा पैशाने वाढलेला नवीन उपक्रम आणि त्यातून लोपत चाललेला महत्वाचा विषय ह्यावर कोणीही जुने जाणते, ज्येष्ठ बोलायला तयार नाहीत.

‘फ्री विंडिंग’च्या माध्यमातून नेमकी कोणती संस्कृती समाजाला आपल्याला दाखवायची आहे हे समजणं कठीण झालंय. आपल्या भारतीय संस्कृतीचे विवाह विषयच विचार खुप प्रगल्भ आहेत. पण विवाहाचा ‘कम्युनिस्ट’ विचार ह्या ‘फ्री विंडीग’ माध्यमातून आपण दाखवतोय. “चार चौघांनी एकत्र येऊन लैंगिक संबंधांना दिलेली मान्यता म्हणजे विवाह” असं ते नसत हो. पण सध्यातर तेच चालू आहे. हे सर्व कोणत्या दिशेकडे जात आहे हा विचार होणे गरजेच आहे. हरिद्रा लेपन हा एक ‘ईवेंट’ होऊन बसलाय. त्यात थिल्लरपणा जास्त वाढला आहे. एक संशोधन असंही आहे की ह्या माध्यमातून दुसऱ्या पती – पत्नित जास्त तणाव वाढत आहे आणि त्यातून घटस्फोटचे प्रमाण जास्त वाढत आहे.

आयुष्यातील अविस्मरणीय विषय कॅमेऱ्यात नक्की कैद करावेत जीवन जगण्यासाठी ते जास्त महत्वाचं असतं हे मान्य. पण लग्न समारंभात फोटो ग्राफर मंडळींनी संस्कृती पेक्षा त्या फोटोलाच जास्त किमंत दिली आहे. सहा ते आठ तास त्यात जातात. लग्न त्यामुळे अडीच ते तीन तास उशिरा लागतात ह्यावरही कुणाचं लक्ष नाही. त्यात मंडपवाल्याप्रमाणे आता त्यांचे देखील ‘पॅकेज’ प्रचंड वाढलेली आहेत. एका ‘पॅकेज’च नाव एकूण तर मी गोंधळून गेलो ते नाव आहे “केंडीडेट फोटो” म्हणजे नवरी नवरदेव ह्यांचे स्पेशल फोटो काढण्याचं एक नवीन ‘पॅकेज’. ते ही वीस ते पंचवीस हजाराच्या पुढे. अहो लग्नचं त्यांचं आहे मग हे नवं ‘पॅकेज’ काय प्रकरण आहे. असे एक नाही अनेक प्रकार वाढत आहेत.

एकंदरीत ही संस्कृती सध्या घरघर ह्या अवस्थेला पोचली आहे. हल्ली मागील आठ दहा वर्षापासून लग्नात डी.जे. नावाचं गारूड पोरांच्या मनावर अधिराज्य करतेय. डिजे नसला तर मुलं लग्न कितीही लांब तारीख धरायचे आग्रही होत आहेत. ह्यामुळेच नंतर मग विवाहाला कित्येक तास उशीर होत आहे. आपण बोलावली आप्तेष्ट मंडळी हताश होऊन त्याच ठिकाणी गर्मीत बसलेली असते, बायका, छोटे मुलं ह्यांना त्याचा खूप त्रास होतो, बर ह्यांचं त्या नाचणाऱ्या पोरांना कसलांही सोयर सुतक नसतं. लाखाच्या पुढे त्याचे मूल्य असतं. वराकडील किंवा वधू कडील मंडळींना नाहक तो ही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नाचताना गाणं आणि त्याचे बोल, आणि असलेला कार्यक्रम ह्याचा काहीही संबंध नसतो. मद्य व्यसनी आणि विलासी तरुणांची भाऊगर्दी त्यात असते.

एकंदरीत हा विषय बुद्धीला पटणारा नाहीये. ज्येष्ठांनी आणि संस्कृती संपन्न तरुणांनी ह्या विषयावर जर लक्ष घातलं नाही तर येणारा काळ जरा जास्त कठीण आहे. भारतीय विवाहाची दिशा आणि दशा दोन्ही सध्या बदलत चालल्या आहेत. ह्या बदलणं आपल्या संस्कृतीला नक्कीच परवडणारं नाही हे मात्र निश्चित खरं आहे. आपण सर्वांनी ह्याचा विचार जरूर करावा इतकचं…

(प्रस्तुत लेखक हे भारतीय राजकारण आणि समाजकारणाचे अभ्यासक आहेत. Mob – 9923225258)

Related posts

पोलिसांनी भर चौकात फाईन मारावा पण शालेय वाहनांची तपासणीही व्हावी

Gajanan Jogdand

हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषावर उच्च पातळी बंधाऱ्यांचा उतारा!

Gajanan Jogdand

विद्यापीठीय राजकीय आखाडा

Gajanan Jogdand

Leave a Comment