शारदीय नवरात्रोत्सव – विशेष प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील माझोड या गावी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरगडच्या रेणुका मातेचा प्रत्यक्ष सहवास आहे.. या गावी रेणुका माता प्रत्यक्ष येऊन येथे विराजमान झाली भक्त गणपतराव पांडे यांच्यासाठी रेणुका माता येथे आली..त्या भक्त गणपतराव पांडे यांचे वारस रवींद्र रमेशराव पांडे यांच्याशी ‘मार्मिक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक गजानन जोगदंड यांनी केलेली विशेष बातचीत चा सारांश…
आज 19 ऑक्टोबर देवीची पाचवी माळ.. मागच्या शारदीय नवरात्र उत्सव श्रुंखलेत आम्ही म्हटल्याप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी काही शक्तिपीठांचे प्रति रूप हिंगोली जिल्ह्यात आढळून येतात.. तर माहूरगड च्या रेणुका मातेचा प्रत्यक्ष सहवास माझोड येथे आहे असे सांगितले जाते…
गुगुळ पिंपरी येथील रवींद्र रमेशराव पांडे यांच्या आज्याचे आजोबा म्हणजे गणपतराव पांडे हे माहूरगडची रेणुका माता यांचे भक्त होते.. भक्त गणपतराव हे आठवड्यातून एक दिवस माहूरगड येथे जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेत असत.. तर नवरात्र उत्सवात दररोज माहूरगड येथे जाऊन रेणुका मातेची आराधना करत..
भक्त गणपतराव हे माहूरगडला मातेच्या दर्शनासाठी पहाटे 4 वाजता तर कधी – कधी 2-3 वाजेच्या सुमारासही स्नान आदी करून निघत असत…
दर्शनासाठी जाताना भक्त गणपतराव हे गुळ आणि फुटाणे आपल्या सोबत घेऊन जात असत.. सकाळी 9 – 10 वाजेपर्यंत ते माहूरगड येथे पोहोचत ते मातेचे असीम भक्त होते..
एकदा दर्शन करून भक्त गणपतराव पांडे हे आपले घर गुगुळ पिंपरी कडे निघत असताना रेणुका माता प्रत्यक्ष त्यांच्यासमोर उभी टाकून त्यांना दर्शन देत ‘आता तू माहूरगडला येऊ नकोस, मीच तुझ्यासोबत येते असे म्हणाली’..
मात्र निघताना रेणुका मातेने मी तुझ्या मागे येते.. तू मागे वळून पाहायचे नाहीस.. तू मागे वळून पाहिले की मी तिथेच थांबेन, अशी अट घातली.. भक्त गणपतराव यांनी मातेची ही अट मान्य करून आनंदी होऊन आपल्या घरची वाट धरली..
माता रेणुका त्यांच्यासोबत मागे – मागे येत होती.. चालताना मातेच्या पायातील चैनच्या घुंगरांचा आवाज भक्त गणपतराव यांना येत होता.. देवी आणि भक्त गणपतराव चालत – चालत येताना माझोड येथे गाव शिवारात देवीच्या पायातील चैनीच्या घुंगरांचा आवाज थांबला..
तेथे देवीच्या मनात येथेच थांबण्याची इच्छा असेल म्हणून हे घडले आणि भक्त गणपतराव यांनी मागे वळून पाहिले आणि रेणुका माता तेथेच थांबली असे सांगितले जाते, असे भक्त गणपतराव पांडे यांचे वारस रवींद्र रमेशराव पांडे यांनी सांगितले.
देवीची स्थापना भक्त गणपतराव पांडे यांच्या हस्ते झाली असे सांगितले जाते. माझोड येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी मराठवाडा, विदर्भ तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येतात..
काही वर्षांपूर्वी माझोड येथील रेणुका माता मंदिराचा विकास करण्यात आला. येथे येणाऱ्या भाविक भक्तांना वीज, पाणी, आसन व्यवस्था आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्त रेणुका मातेच्या चरणी लीन होऊन आपली मनोकामना रेणुका मातेला सांगतात.. ही मनोकामना रेणुका माता पूर्ण करते असे अनेकांचे म्हणणे आहे..
भक्त गणपतराव पांडे यांच्या नंतर रवींद्र रमेशराव पांडे यांचे आजोबा अनंता वासुदेवराव पांडे हे रेणुका मातेची आराधना करत..
पुढे शिक्षणाने पांडे कुटुंबीय येथून स्थलांतरित झाले.. मात्र कोणताही कार्यक्रम असला की देवीच्या दर्शनासाठी हे कुटुंब माझोड जाते..
या कुटुंबास देवस्थान कडून योग्य मानसन्मान आणि आदरातिथ्य केले जाते, असे गणपतराव पांडे यांचे वंशज रवींद्र रमेशराव पांडे यांनी सांगितले.